दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या असतील. माता पार्वतीने देवी दुर्गेचे रूप धारण करून केलेला महिषासुराचा वध, श्री रामाने केलेला रावण वध म्हणजेच चांगल्या प्रवृत्तींनी केलेला वाईट प्रवृत्तींचा नाश! या बरोबरच, दसरा सणाचे आणखी एक महत्व सांगितले जाते ते म्हणजे सिमोलंघनाचे व त्या बरोबरच शस्त्रपुजेचेही. त्यांचा संबंध महाभारताशी आहे. असे मानले जाते की या दिवशी पांडव अज्ञातवासातून परत आले होते म्हणजे त्यांनी राज्याची सीमा ओलांडून आत प्रवेश केला होता म्हणून सिमोलंघनाचे महत्व, तसेच महाभारताच्या युध्दासाठी तयारी करताना अर्जुनाने शमीच्या वृक्षात ठेवलेली आपली आयुधे बाहेर काढली होती व त्यांची पुजा केली होती.
आपण या नवरात्रात, नऊ रात्री जागवल्या. शक्ती व सिध्दींची उपासना केली. देवीच्या अर्थात शक्तिच्या नऊ रूपांचे महत्व जाणले तसेच रावण दहन करून आपण दुष्ट प्रवृत्तींचा नाश व चांगल्या प्रवृत्तींचा विजय साजरा केला. आयुधे पूजली, आजच्या काळातील आयुधे म्हणजे दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी Tools, वह्या, पुस्तके, फोन, संगणक, इतर मशीन्स, या व्यतिरीक्त वाहनांची पुजा केली. एकुण दहा दिवसांचा हा सण साजरा केला. काहींनी कडक उपास केले तर काहींनी गोडधोड पक्वान्नांचा आस्वाद घेतला, नवीन वस्तुंची खरेदी केली.... कळत-नकळत नवरात्रीचे उत्साहात आपल्यातील ऊर्जा, आपल्यातील शक्तिला व्यक्त केले. हेच तर उद्दिष्ट होते या सणाचे, दरवर्षी साज-या केल्या जाणा-या नवरात्रीचे. पण दस-या नंतर काय? आज काय केले? उद्या काय करणार? येत्या काही दिवसांत, महिन्यात, वर्षात काय करणार? काही ठरवले? दसरा जो साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त, या मुहुर्तावर असे काही नवीन करण्याचा संकल्प आपण करतो जे चिरंतर, शाश्वत राहील. खूप काळ पुढे चालू राहील असा एखादा उद्योग, नवीन वाहन, घर या झाल्या सर्व भौतिक गोष्टी. पण सिमोलंघन हे फक्त भौतिक स्वरूपाचे असते का. तुम्ही एखादा प्रण केला असेल- ‘मी आज पासून रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करेन’, ‘कुणाशी भांडणार नाही’, ‘नेहमी पॉझिटीव्ह विचार करेन’, ‘निराश होणार नाही’, ‘एखादे नविन शिक्षण घेईन जे आयुष्याला पूरक होईल’. असे मानसिक, शारिरीक, सामाजिक पातळींवर पण आपण सिमोलंघन करतो फक्त आपण त्याचा कधी इतका खोलवर, Consciously विचार केला नसेल कदाचित.
मला असे वाटते की दसरा या सणाचे महत्व हे जसे आपल्यातील अनेक सुप्त शक्तिंना जागृत करून, आपल्यातील अनेक गुणांना व्यक्त करण्यासाठी, त्यांचा विकास करून आपले जीवन समृध्द करण्यासाठी आहे व वाईट विचार दूर करून शुध्द, चांगल्या विचारांना आयुष्यात सामावून घेण्यासाठी आहे, तसेच या सणाचा तिसरा उद्देश आपल्या मर्यादा ओळखून त्यांवर मात करण्याची आठवण करून देणे हा आहे. शारीरिक, मानसिक अथवा बौध्दिक शक्ति वाढवून आपले उद्दिष्ट साधण्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या त्रिगुणांवर ताबा ठेऊन अनेक प्रकारच्या प्रलोभनांच्या सीमा पार करून पुढे जाणे हे ‘सिमोलंघन’ दैवी शक्तिंना अभिप्रेत असावे. आता पहा ना - आपल्याला नवरात्रात आपल्यातील विविध शक्ति व सामर्थ्याची (Energy & Capability) ओळख झाली, आपल्याला असलेल्या सिध्दी म्हणजेच आजच्या भाषेत कौशल्यांची (Skills) आपण नवमीला आठवण केली, या कौशल्यांचा उपयोग करण्यासाठी जी आयुधे (Tools) उपयोगात आणतो त्यांची पुजा केली – मग या नंतर अर्थातच या तिनही गोष्टींची मेळ घालत आपल्याला पुढे जाणे आहे. आपल्या comfort zone मधून बाहेर पडल्या शिवाय आपले ध्येय आपल्याला गाठता येईल काय? त्यासाठी आपणच आपल्यावर घातलेली बंधने, मनातील भिती, असंख्य शंका-कुशंका, ‘लोक काय म्हणतील’ या विचाराचे स्वतःच्या निष्क्रियतेवरती घेतलेले पांघरूण अशा सर्व ख-या खोट्या बंधनांना झुगारून देऊन स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलणे हेच खरे सिमोलंघन!
श्रीरामाचेच उदाहरण घेऊ. समुद्र पार केला तेंव्हाच रावणाचा वध करता आला! देवाचा अवतार होता म्हणून बसल्या जागी काहीच मिळाले नाही. जन्म घेताना ध्येय ठरलेले होते पण त्यासाठी त्यालाही लहान वया पासून ‘तयारी’ करावी लागली. आधी शिक्षणासाठी गुरूकूलात जावे लागले, तिथे अनेक राक्षसांशी लढून आपल्या ज्ञानाचा, युध्द कौशल्याचा कस लावावा लागला. परिक्षा होती ही. त्यानंतर चौदा वर्ष वनवासात रहावे लागले, कदाचित रावणा सारख्या अतीपराक्रमी राक्षसाशी झुंज देण्यासाठी वनवास हे ‘Preparation ground’ असावे. व त्यानंतर समुद्र पार करून रावणाचा वध. श्रीरामाने प्रत्येक वेळेला सिमोलंघन केले. श्री कृष्णाला तर जन्मताच आई-वडीलांपासून दूर जाऊन आयुष्याची सुरवात करावी लागली. त्यामुळे देवाच्या अवतारांनाही जे चुकले नाही ते आपल्या सारख्यांना कसे चुकेल?
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सीमोलंघन करावेच लागेल!
🙏🙏🙏
ज्योतिषाचार्य डॉ अनुपमा रहाळकर