"भविष्य का पहावे? भविष्य कोणी पहावे? भविष्य केंव्हा पहावे."



"भविष्य का पहावे?भविष्य कोणी पहावे? भविष्य केंव्हा पहावे."©

संदर्भ: खूप मोठी यादी आहे पण निवडक उल्लेख करते.

(१) माझी आई कै. गिरीजाबाई छत्रे, जिच्या कडून मी हस्तसामुद्रिक,व फेसरिडींग शिकले "हात  व चेहरा पहाण्याची सकाळची वेळ ठराविक असावी. (ढळढळीत सूर्य प्रकाशात- हे तिचे शब्द) अर्थ- प्रकाश नॅचरल हवा, क्लिअर असावा, प्रखर नको किंवा मंद ही नको.

(२) ज्यांच्या कडून फेसरिडींग शिकले ते गुरू, माझे काका कै. हरिहर छत्रे, (वेटर्नरी डॉक्टर व फॉरेस्ट ऑफिसर)

(३) कै. गानुकाका (, माझ्या वडिलांचे मित्र) ज्यांनी सर्वात जास्त "चेहरा पाहून भविष्य" शिकवले अगदी हातचे काहीही न राखून, सर्व ज्ञान दिले व काही महत्त्वाचे नियम पण शिकवले.

४) कुंडली वरुन भविष्य सांगताना कुठले नियम पाळावे - हे कै.वि.धों गोरे शास्त्री

५) अलिकडच्या काळात (२००८ मधे व नंतर ही वारंवार ज्यांचे कडून शिकले व आजही शिकते आहे) ते गुरूवर्य श्री. नंदकिशोर जकातदार.

(याशिवाय काही गुरूंनी आणि काही पुस्तकांनी माझ्या ज्ञानात जी भर घातली त्यासाठी कृतज्ञ आहे 🙏)

आपण लेखाला सुरूवात करूया लेख मोठा आहे क्रमशः लेखमाला सुरू करीत आहे.

फेसरिडींग: मुद्रा वाचन! मुद्राभिनय. चेह-यावरच्या रंगछटा, डोळे बोलतात, चेहरा सांगून जातो मनातले विचार! हे सर्व चेह-यावरून भविष्य सांगताना फार उपयोगी आहे. फोटोवरून ५०%च, तर प्रत्यक्षात बघून १००% भविष्य बरोबर सांगता येते. मग पत्रिकेची गरजच काय?

तर पत्रिका जर चेह-यावरून बनवायची असेल तर निदान जन्म तारीख (इंग्रजी, किंवा मराठी) तिथी, नक्षत्र त्यादिवशीचे) लागते फक्त रवि कुठल्या राशीत आहे पहाण्यासाठी. जन्म वेळ व जन्म ठिकाण नसले तरी चालते. अर्थात ही नेहमीची पद्धत नाही म्हणजे ज्यावेळी सहजपणे जन्म तारीख, जन्म वेळ,जन्म ठिकाण, उपलब्ध आहे, तीथे कुठल्याही पद्धतीने पत्रिका बनविणे योग्य. मग पारंपरिक पद्धतीने, किंवा के.पी. पध्दतीने हे ज्याच्या त्याच्या पध्दतीवर अवलंबून आहे. चेहरा वाचन करताना तुमचे चित्त एकाग्र असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्ही समोरच्या व्यक्तीचा चेहरा वाचू शकणार नाही. त्याचा स्वभाव व त्याच्या विचारांचे कंगोरे जाणून घ्यायचे, तर तुमच्या मनात इतर विषय असू नयेत.

यासाठी फेसरिडींग हे शास्त्र शिकणाऱ्या, व त्या वरून भविष्य कथन करणा-या अशा दोन्ही व्यक्तींना ध्यान धारणा (मेडीटेशन) करणे आवश्यक आहे. ध्यानधारणा ही गुरु कडून शिकावी. कोणीही एकदम ध्यान करू शकत नाही. ध्यानाच्याही अनेक पद्धति आहेत त्यातिल आत्मसात करून नंतर त्याचा स्वत: सराव करत रहावा लागतो तेंव्हाच तुम्ही फेसरिडींग करताना चेह-यावरचे भाव ओळखू शकता. चेहरा वाचन अर्थात फेसरिडींग बद्दल आपण अधिक माहिती पुढील काही लेखांतून जाणून घेणारच आहोत पण त्या आधी हे समजून घेऊ की, “भविष्य का पहावे? भविष्य कोणी पहावे? भविष्य केंव्हा पहावे?”  क्रमशः...(२)

 

भविष्य का पहावे? भविष्य कोणी पहावे? भविष्य केंव्हा पहावे?”

भाग- २

संदर्भ - किरो यांची पुस्तके विशेषत: हस्तसामुद्रिक व अंक ज्योतिषासाठी, तर कै.श्री.ल.फाटक यांची पुस्तके चेहरा वाचन व चेह-यावरून कुंडली बनविण्यासाठी. दिल्लीला कर्नल (कै.) थपलियार यांचे कडे चेहरा वाचनावरचि हिंदीतील पुस्तके वाचली. त्याचाही संदर्भ बहुतेक लेखात येणार आहेच.

भविष्य का पहावे? - हा काय प्रश्न झाला? प्रत्येकालाच पुढे काय घडेल ते जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज आपण ज्याला ‘भविष्य’ म्हणतो, म्हणजेच पुढील काळ, त्यात घडणा-या घटना.

भव+ईश! भव= भाव, भवसागर, आणि ईश= ईश्वर! थोडक्यात या भवसागरात, ‘भव!’ (पुढे) घडू दे! उदाहरणार्थ- “विजयी भव”- “विजयी हो!” हा भवचा एक अर्थ.  दुसरा भव म्हणजे ‘भाव’- ज्योतिषात प्रत्येक स्थानाला  ‘भाव’ म्हणतात. प्रत्येक भावाचा एक स्वामी आहे. तर असे हे भविष्य जाणून घ्यायचे तर “ज्योतिष” हे ही जाणणे जरूरीचे. आता तुम्ही म्हणाल “भविष्य” म्हणजेच “ज्योतिष”!! अगदी बरोबर पण वर वर दिसायला हे समानार्थी शब्द असले तरी प्रत्यक्षांत तसे नाही. भविष्य जाणून घेण्याचे शास्त्र ते ज्योतिष! ज्योती + ईश = ज्योतिष!! आपण दोन्ही शब्द वापरतो. तर आता ज्योती + ईश काय आहे? तर….साक्षात ईश्वराने ब्रह्मांडात टाकलेला प्रकाशझोत! तेजोनीधी सूर्य व आल्हाददायक शितल चंद्र! अनेक तेजोमय तारे, आणि लुकलुकणा-या चांदण्या! मनमोहून घेणा-या या विलोभनीय दृष्याकडे आदिमानव ही भान हरपून बघत रहायचा.

अनादि काळापासून मानवाला या अनंत आकाशाचे आकर्षण व कुतुहल वाटत राहीले आहे. या विलोभनीय दृष्याचे आकर्षणातूनच मानव आकाशाचे निरीक्षण व अभ्यास करायला लागला. या निरीक्षणातूनच त्याला सूर्य, चंद्र, तारे यातील फरक कळू लागला. स्थिर-अस्थिर ज्योतीचे, प्रकाशाचे, तेजोमय प्रकाशाचे, प्रखर तेजाचे, आणि अंधाराच्या साम्राज्याचेही ज्ञान त्याला झाले. आकाशातल्या तेजोमय ज्योतीचे शास्त्र ते ज्योतिषशास्त्र. याच्या आधारे हा भवसागर तरून जायचा आहे. ईश तर दोन्हीशी संबंधीत आहे. ज्याने इतर प्राण्यांचेपेक्षां बुध्दिचे अधिक वरदान मानवाला दिले. मानवाचे अभ्यास व निरीक्षणातून चंद्र, सूर्य, नक्षत्र, भ्रमणे, यातुन प्रथम खगोलशास्त्र जन्माला आले व नंतर ज्योतिषशास्त्र निर्माण झाले. सूर्य हा तारा आहे, तेजोमय सूर्य स्थिर असून बाकी ग्रह, आपली पृथ्वी सुध्दा त्याचे भोवती फिरते. या खगोलशास्त्रीय निष्कर्षाचे जोडीला इतर ग्रहांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, पृथ्वीवरील प्राणिमात्रांवर होणारे परिणाम, सृष्टितील होणारे बदल, ऋतु हे ही मानव ओळखु लागला, त्यातूनच ग्रह, तारे, नक्षत्र मानवाचे जीवनावर काय चांगले अथवा वाईट परिणाम करतात ते शोधण्यासाठी काही नियम, तत्वे बनली. मानवाच्या अनेक पिढ्या या विषयावर अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात यशस्वी झाल्या. त्यांच्या त्या श्रमाचे फल म्हणजेच अथांग सागराप्रमाणे विस्तिर्ण व खोल असे हे ज्योतिष शास्त्र! ज्याला ज्याला याचे आकर्षण वाटेल, अभ्यास करावासा वाटेल, स्वत:चे व दुस-याचे करिता ही उपयोग करावा वाटेल त्या प्रत्येकाने किमान स्वत:चे भविष्य पहावे. समस्या अधिक चांगल्या प्रकारे सोडविण्यासाठी, चांगले जीवन जगता यावे यासाठी आपण चांगले घर पहातो, चांगली नोकरी, व्यवसाय निवडतो त्यासाठी आधी चांगले शिक्षण घेतो. अथक प्रयत्न करतो चांगले यश यावे यासाठी. तर मग यासाठी भविष्य पाहिले, ज्योतिषाचे मार्गदर्शन घेतले, कुठले शिक्षण घ्यावे, कुठल्या क्षेत्रात नोकरी वा व्यवसाय करावा हे जाणून घेतले तर जीवन अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी होईल.

हे  झाले ज्योतिष कोणी पहावे व का पहावे याचे थोडक्यात उत्तर. पण हे उत्तर सर्व प्रश्न सोडवित नाही. कारण तहान लागली की विहिर खणायची आम्हाला माहिती आहे! आम्हाला प्लॅनिंग करता येत नाही’. जर ज्योतिषशास्त्र इतके प्रगत आहे की साक्षांत गौतमबुध्दांचे भविष्य ते लहान असताना वर्तवले गेले होते. मग आपलाही मुलगा काय शिकेल? काय प्रगती करील? त्याला कशाची आवड असेल, किंवा निर्माण होईल. त्याला काय संकटे येतील हे आई, वडिलांनी जाणून घेतले तर त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतुद, प्रयत्न त्यांना करता येतील. अर्थातच जीवन अधिक सुखी करण्यासाठी प्रत्येकाने ‘भविष्य’ जाणकार ज्योतिषाकडून जाणून घ्यावे. येणा-या समस्या संकटे जाणून घ्यावित, ज्योतिषी हा विधीलिखित टाळू शकत नाही पण शिक्षक जसा तुम्ही चांगल्या गुणाने परीक्षा उत्तीर्ण व्हावे म्हणुन तुमची अभ्यासाची तयारी करून घेतो तद्वत ज्योतिषी मार्ग दाखवितो. आत्मविश्वास वाढवितो, कुठले ग्रह त्रास देणार आहेत त्याची कल्पना देतो. संकटाचि तीव्रता कमी करण्यासाठी उपाय, उपासना सांगतो. तेंव्हा संकट दारात येण्यापूर्वी जाणून घ्या…..क्रमश:३

                   लेखिका – रेखा छत्रे रहाळकर,

ज्योतिष विशारद, भविष्य भूषण,हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


भविष्य का पहावे? भविष्य कोणी पहावे? भविष्य केंव्हा पहावे?”

भाग-३

संदर्भ- भाग १ व भाग २ मधे दिलेल्या संदर्भाशिवाय निश्र्चितच उल्लेख करायला हवा तो कोटा येथील श्रीवास्तवजी यांचा! ज्यांचेकडे ‘भृगुसंहिताचे ज्ञान मिळाले. विशेष म्हणजे अनेक पुरातन ग्रंथ पहायला मिळायला ही नशिब लागते, आणि कर्मधर्म संयोगाने श्रीवास्तवजींचे धाकटे बंधू दिल्लीला आमचे शेजारी रहात होते. माझी ज्योतिषाची आवड पाहून त्यांनी श्रीवास्तवजींना रिक्वेस्ट करून ते ग्रंथ मला वाचायला, नोट्स काढायला उपलब्ध करून दिले. माझे परम भाग्य समजते मी.. हे ग्रंथ माझे गुरू !

आज ब-याच गोष्टीत ज्योतिर्विंदात मतमतांतरे असतात. पौराणिक ग्रंथात काही वेळेस समर्पक उत्तरे मिळतात म्हणून सांगेन की ज्योतिषशास्त्रा विषयी जिथे जे वाचायला मिळेल, ते वाचावे. ज्यांना ज्योतिष शिकायचे आहे, त्यांनी तरी जरूर वाचत जावे व ज्ञान वाढवावे. ज्ञानाशिवाय तुम्हाला त्या विषयावर चर्चा तरी कशी करता येणार? ब-याचदा लोक फारशी माहिती नसताना ज्योतिष शास्त्राला नांवे ठेवतात. तेंव्हा सांगावेसे वाटते कि पूर्वजांचा हा खजिना लुटा. हो! लुटुन कधी विद्या कमी होत नसते पण त्यानंतर निश्चितच तुम्ही ज्योतिष हे शास्त्र आहे मान्य कराल, इतरांना सांगाल.

विषयांतर झाले थोडेसे, पण भविष्य कां पहावे? याची प्रचिति येण्यासाठी या शास्त्राची ओळख व्हायला हवी. ‘प्रारब्ध’ समजून घ्यायचे तर ‘प्रारब्ध कुंडली’ माहिती करून घ्या. पत्रिकेतील पहिले, चवथे, सातवे व दहावे घर ही चार स्थाने मिळून प्रारब्ध कुंडली होते. पहिले घर स्वतःचे, चवथे आईचे, सातवे जोडीदाराचे आणि दहावे पित्याचे. या चार घरांवर बहुमतांशी घटना अवलंबून आहेत. हे आम्ही ज्योतिषाचे वर्गात शिकवत असतो. इथे उल्लेख करायचा हेतू हा की जसा आपला जन्म कुठल्या घरात व्हावा हे आपल्या हातात नाही, आपले आई-वडील कोण असतील ते आपण ठरवू शकत नाही, तद्वतच आयुष्याचा जोडीदार, जीवनसाथी ही कोण होईल हे नशिबानेच ठरविलेले असते. त्याचे स्थान आहे सातवे. सप्तम स्थानावरून जोडीदार कसा मिळेल समजते. संसार कसा होईल समजते..

थोडक्यात खरोखरच विवाह स्वर्गात ठरतात आणि पृथ्वीवर होतात. असेच नाते जुळते “आकाशाशि धरणी मातेचे”!!

आता आपण या वळणावर आलो की भविष्य का पहावे? कोणी पहावे?... विवाहेच्छुकांनी तर पहावेच पण त्यांच्या पालकांनीही पहावेच. पुढे जावून मी असे म्हणेन, की मुले लहान असतानाच जसे त्यांच्या शिक्षणाचे, करिअरचे दृष्टीने ज्योतिष बघावे हे मी आधीच्या लेखात मांडले, तसेच जर मुला-मुलींचे विवाह कुठल्या वयाला होतिल हे जर पालकांनी लक्षांत घेतले तर मुलांचे करिअरचे, जोडीने विवाहाचे दृष्टीनेही काही निर्णय आधी घेवून त्यानुसार आंखणी करता येईल. पत्रिकेत पहिल्या व सातव्या घरात असलेल्या राशी, ग्रह, युती यावर विवाहाचे वय समजते. काही ग्रह प्रथम वा सप्तमस्थानी असता विवाह लवकर म्हणजे २२, २४, २६व्या वर्षी होतो. तर बुध, शनी, राहु, केतु यासारखे ग्रह प्रथम वा सप्तम स्थानी असता लग्न २८ वया पुर्वी होणे अवघड असते. अशा वेळी ज्योतिषाचा सल्ला घेवून, जर विवाहास उशिर असेल तर मुलगा असो वा मुलगी करिअरला, नोकरीला, प्राथमिकता द्यावी. उगीचच विवाह जुळविणा-या संस्थांचे उंबरे झिजवू नयेत. लग्न जमत नाही, म्हणून मुलांना टोमणे मारू नयेत किंवा त्यांचे नशिबच कसे वाईट आहे समजून पॅनिक होवू नये. या ऐवजी त्यांना वेगवेगळ्या कला, शिक्षणाच्या शाखा शोधुद्यात किंवा अधिक चांगले करिअर निवडायला मदत करा.

समाजात ही पसरू द्या कि लग्नाच वय ही स्वर्गातच ठरले आहे. नाहीतर लग्न वेळेवर होत नाही म्हणून शेजारी पाजारी, नातलग परीचित स्वतःचिच जबाबदारी असल्या सारखे स्थळे सुचवायला सुरू करतात. विवाह जुळविताना पत्रिका जुळतात की नाही? हे पहाणे आलेच. संसार सुखाचा होण्याचे दृष्टीने दोघांचे विचार जमतिल का? हे ही पहावे. संतती, सांपत्तिक स्थिती सर्वाचाच विचार करताना. घटस्फोट तर होणार नाही ना, हे पहाणे आलेच.

अशा प्रकारे मुलांचे वैवाहिक जीवन सुखाचे होईल का हे पालकांनी मुलांच्या पत्रिका जाणकार ज्योतिषास दाखवून माहिती करून घ्यावे किंवा विवाहेच्छुंनी स्वतः जाणून घ्यावे …. क्रमशः ४

 

भविष्य का पहावे? भविष्य कोणी पहावे? भविष्य केंव्हा पहावे?” 

भाग-४

संदर्भ,- या आधीचे भाग क्रमांक १,,, प्रमाणे मला लाभलेले गुरूवर्य, मी वाचलेले पौराणिक ग्रंथ, अलिकडच्या काळातील, तरीही त्यामानाने जुन्या काळातील ज्योतिषावरील पुस्तके, अगदी अलीकडच्या काळातील ज्योतिषावरील पुस्तके, कै.म.दा.भट यांची पुस्तके, इत्यादी साहित्याचे जोडीला, साक्षात, ज्योतिष सांगताना आलेले अनुभव.

भविष्य का पहावे? याबद्दल शिक्षण, विवाह, याबाबतित वेळेवर ज्योतिषाचे मार्गदर्शन कसे उपयोगी ठरेल, हे सांगण्याचा प्रयत्न मी या पूर्वीच्या लेखात केला आहे. आज मी ज्योतिष शास्त्रात असलेल्या शाखा, याविषयी माहिती देत आहे. तुम्ही किती प्रकारे भविष्य जाणून घेऊ शकता.

ज्योतिष शास्त्राच्या शाखा..

(१) फलज्योतिष म्हणजेच जन्मपत्रिकेच्या आधारे सांगितलेले भाकीत. यांमध्ये ही अनेक पध्दतीने सांगितले जाते. जसे उदाहरणार्थ पारंपरिक, के.पी. पध्दत

२) हस्तसामुद्रिक - जातकाचा (भविष्य जाणून घेवू इच्छिणारा) हात पाहून, तळहातावरील रेषा, उंचवटे, हाताची ठेवण, हातांचा रंग, बोटे, नखे यावरून सांगितले जाणारे भविष्य,स्वभाव इत्यादी

(३) अंकज्योतिष - जन्म तारखेवरून सांगितले जाणारे भविष्य. तसेच जातकाच्या नावाला येणाऱ्या अंकांवरून (अक्षरांना काही नंबर दिले आहेत), किंवा ज्या दिवशी प्रश्र्न विचारला गेला तर या दिवशी तारीख, महिना, वर्ष यावरून

(४) चेहऱ्यावरून- चेह-याचि ठेवणं, कपाळ,नाक, डोळे, हनुवटीची ठेवण डोक्याचा आकार, केस, चेह-याचा रंग. कानाची ठेवण, गळा, यात फक्त चेहरा, डोके, खांद्यापर्यंत भाग यावरून भविष्य वर्तवले जाते.

(५) देहबोली- यात व्यक्तिचे चालणे, बोलणे, वावरणे यांच्या निरीक्षणावरून, पावलांची ठेवण, जमिनीवर उमटणारा पाऊलाचा ठसा (यावरून स्वभाव ओळखणारे लोक आहेत)

(६) हस्ताक्षर, (७) शरीरावरचे तीळ (८) नामाक्षरे ९) स्वाक्षरी इत्यादी

अजून ही अनेक प्रकार आहेत. यथावकाश आपण त्या बद्दल माहिती पुढे ही घेणार आहोतच पण आज आपण माझे काही अनुभव पहाणार आहोत.

असे भविष्य ... असे अनुभव  (१)

१९७० सालची गोष्ट आहे. माझ्या ओळखीतल्या एका महिलेने मला घरी बोलावले म्हणून गेले. तीचे वय तेंव्हा ३५ होते, तिचा विवाह नव्हता झाला. तिच्या मावशिने एक स्थळ सुचविले होते. ती व्यक्ती मी पहावी व मत द्यावे हा हिचा आग्रह होता म्हणून गेले...

उच्चपदस्थ अधिकारी होते ते, रंग रूप ही ठीक, बोलणं झालं त्यावरून चांगले वाटत होते. मावशिने सुचविले म्हणजे माहिती काढली असणार..तरीही त्या व्यक्तिला बघताना मला काही तरी खटकत होतं...या माझ्या मैत्रिणिच्या ते लक्षात आले.. मला घरी सोडायला आली, म्हणाली,"बोला,जे सांगायचे ते मोकळेपणाने सांगा".. मला दिसत होते ती खुश आहे, आणि मला जे माझ्या ज्ञानाने समजत होते, ते लपविणे आणि पुढे जा सांगणे योग्य नव्हते. कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली होती..

पण तीने परत सांगितले की तुमच्या मतावर मी माझा आयुष्याचा निर्णय घेणार आहे..!

मग मात्र मला गप्प बसवेना.."वर्तणुक चांगली वाटत नाही..एखादी स्त्री आयुष्यात असावी.. पाहिजे तर खात्री करून घ्यावी त्यांचे गांवाला जावून ". ..भराभर बोलून टाकले मी..! पण मैत्रिण पक्की खंबीर आणि माझ्या वर प्रचंड विश्वास, माझा जेवढा माझ्या वर नाही तेवढा...

"ठीक आहे म्हणाली, "मावशिच्या गावचा आहे, तिथेच जाते आणि शोध घेते" मावशि अचानक भडकली, "मी काय तुझं वाईट का करणार आहे? कोण कुठली मैत्रिण ती जवळची झाली का" वगैरे, वगैरे मावशिने सुनावले..पण ही अडुन बसली. आठ दिवस मावशिकडे तळ ठोकला तीने.. माहिती काढून आणली..

त्यामाणसाच्या घरात स्त्रि रहात होती. पत्नीसारखी. मग पूर्वीच्या भाषेत सांगायचे तर....जावू दे.. आजकाल त्याला रिलेशनशिप म्हणतात...!

मावशिला विचारले तीने "हे तूं माझे कल्याण करणार होती का?? "

परत आली, मला भेटली म्हणाली "तुझी ही विद्या वाढव ".......!

असे .. ज्योतिष.. असे.‌‌..अनुभव..(२)

लहान मुलांचे ज्योतिष बघु नये असे नाही .‌.लहान मुलांच्या देखत भविष्य बघू नये बोलू नये. एक मजेशीर घटना सांगणार आहे. परिणामी ती कशी मजेशीर राहिली नाही हे ही जाणून घ्या. माझी आई भविष्य बघत असे मी पूर्वीच सांगितले,.. एकदा एक बाई तिच्या कडे आपल्या १२/१३ वर्षाच्या मुलीला घेवून आल्या.. म्हणाल्या "हिच्या नशिबात काय आहे सांगा, अगदी कंटाळून गेले आहे, अभ्यास करत नाही, सतत नापास होते.‌ बाकीची भावंडे शिकली. ही शाळेत जायला कंटाळा करते"... आईने सर्व ऐकून घेतले म्हणाली "इतक्या लहान मुलीचा हात नाही पहात, पण बघते" आईने हात पाहिला, "काही काळजी करू नका. थोडी मठ्ठ आहे पण नशीब बलवत्तर घेऊन आली आहे जन्माला.. घरातलं काम काज शिकवा, १६/१७ वर्षीच लग्न होईल. छान गडगंज श्रीमंत सासर मिळणार आहे."...ती बाई तर खुषी-खुषी गेली.. आणि चार दिवसांत डोकं धरून आली. म्हणाली "पोरीने हद्द केली. ज्याला त्याला सांगते, मी कशाला शिकू, चांगले श्रीमंत सासर मिळणार आहे मला...नाहीतरी शिकून काय करणार, भाकरीच भाजायची ना?".. आणि तीने चक्क शाळेत जाणार नाही, माझं नाव काढून टाका हाच हेका धरला..".. "आता काय करू तुम्हीच सांगा".. अक्षरशः रडकुंडीला आली बाई ती..

पुढे चार वर्षांत खरंच त्या मुलीचं लग्न झाले.. सासर चांगले मिळाले पण अडाणी ती अडाणीच राहिली..मग शिकलेल्या भावंडांसमोर कमी पणा वाटायचा, मुलं ही तिची फारशी शिकली नाहीत.. इस्टेट तर होती पण व्यवहार कळत नव्हते..

याला नशिब म्हणायचं का? नाही. मी म्हणेन डॉक्टर प्रमाणे ज्योतिषानेही सर्व गोष्टी उघड करु नयेत.. निदान वेळ पाहून सांगावे... मी तरी या घटने नंतर हा धडा घेतला..!

              लेखिका – रेखा छत्रे रहाळकर,

ज्योतिष विशारदभविष्य भूषण,हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ

 



1 comment:

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...