‘शापित योग किंवा पिशाच्च योग’ - लेख १

 

                              


सध्या एकच गहन चर्चा ज्योतिष क्षेत्रात सुरू आहे. २९ मार्च २०२५ रोजी शनी गोचर मीन राशीतून सुरू होत आहे. मीन राशीत प्रथमपासून म्हणजेच साधारण गेले दीड वर्ष राहू आहे. राहूची ही धास्ती बऱ्याच जातकांना आणि इतर लोकांनाही नेहमीच वाटते. राहू महादशा, अंतर्दशा, राहू विदशा, पत्रिकेतील राहू ज्या भावात आहे त्याची उत्सुकता असते. आता प्रत्यक्ष शनिदेव ही मीन राशीत प्रवेश करणार असल्याने ही उत्सुकता ताणली गेली तर नवल नाही. सध्या तरी २२ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत शनिदेव ‘अस्त’ अवस्थेत आहेत. जरी २९ मार्च २०२५ रोजी शनीचा प्रवेश मीन राशीत होत असला तरी तो प्रवेश ‘अस्त’ अवस्थेत आहे. ३१ मार्च २०२५ ला शनि उदित होतील.

शनि गोचर एका राशीमध्ये अडीच वर्षे म्हणजे ३० महिने असते. मीन राशीत पहिला, कुंभेस दुसरा, मकर राशीत तिसरा, धनु राशिस चवथा, वृश्चिकेस पांचवा, तुळेस सहावा, कन्येस सातवा, सिंह राशीस आठवा, कर्केस नववा, मिथुनेस दहावा, वृषभेस अकरावा, आणि मेषेस बारावा याप्रमाणे शनि प्रत्येक राशीत येत आहे. २९ मार्च २०२५ ते २ जून २०२७ पर्यंत शनी यानुसार प्रत्येक राशीत आहे. २०२७ ला तो मेष राशीत प्रवेश करेल.

सध्या मीन राशीत पहिला शनी येत असल्याने मीन राशीचे साडेसातीचे दुसरे अडीचके सुरू होत आहे. कुंभेचे तिसरे म्हणजेच शेवटचे अडीचके सुरू होत आहे. मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीस साडेसाती सुरू होत आहे. शनीची ‘ढैय्या’ म्हणजेच ‘पनौति’ (छोटी साडेसाती असे ही म्हणतात) धनु व सिंह राशीस सुरू होत आहे, कंटक शनी दशा, कर्क राशीची संपून सिंह राशीस प्रारंभ होईल. धनु राशीत चवथा व सिंह राशीत आठवा शनी आहे.

साडेसाती इतकेच चवथा व आठव्या शनीचे भय लोकांना जाणवते. तसे भय बाळगण्याची अजिबात आवश्यकता नाही मात्र काही बंधने स्वतःवर वागणे, बोलणे याबाबतीत घालून घेतलेली चांगली. त्याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करूच. आज आपण मीन राशीतील शनि आणि राहू दोन्हीही अशुभ ग्रह एकत्र येत आहेत, हा “पिशाच्च योग” बनतो त्याबाबत माहिती घेणार आहोत. सध्या मीन राशीत शनी प्रवेश झाल्यावर एकूण सहा ग्रह मीन राशीत असणार आहेत. रवी, बुध, शुक्र, शनि, राहू, आणि नेपच्यून यापैकी रवी १३ एप्रिलला मेषेत जाईल, तर राहू १८ मे ला कुंभेत जाईल.

चंद्र राशीतून शनीचे भ्रमण म्हणजेच साडेसाती. साडेसातीचे काळात शनी न्याय करतो. शनी न्यायाची देवता आहे. ‘कुकर्म’ करणाऱ्यांना शासन व ‘सत्कर्म’ करणाऱ्यांना पारितोषिक हा शनीचा नियम आहे. अहंकारी, गर्विष्ठ, उद्धट, कामचुकार, बेशिस्त व्यक्तींना शिस्त लावण्याचे काम या साडेसातीत शनिदेव करीत असतात. गुणीजनांचीही परीक्षा घेत ते त्यांच्यातल्या गुणांना संकटांच्या कसोटीवर उतरवितात. म्हणूनच शनिदेव क्रूर, क्रोधी, दृष्ट वाटतात. कारण फार मोठ्या कठोर शिक्षा ते देतात. अनेक रेंगाळलेली कामही ते शिस्तबद्ध पद्धतीने नशिबाचे फटकारे मारत पण पूर्ण करून देतात. उदाहरणार्थ घर, नोकरी, प्रमोशन, विवाह इत्यादी त्यामुळे शनिदेव अशुभ वाटले तरी शेवटी शुभच घडवून जातात. मात्र साडेसात वर्षात केव्हांही घोर संकटांचा सामना करावा लागतो. यात अपघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, छल कपटाने आरोप किंवा प्रत्यक्ष चुकांमुळे ही स्थानबद्धता, जेल, शिक्षा या गोष्टी घडतात. आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शनि अतिशय अशुभ वाटतात व त्यांची धास्ती सर्वांनाच वाटते. याचवेळी राहू सारखा अशुभ ग्रह ही मीन राशीत गेले दीड वर्ष आहे व अजून १८ मे पर्यंत आहे म्हणजेच २९ मार्च २०२५ ते १८ मे २०२५ राहू व शनी हे दोन्ही अशुभग्रह एकत्रित असल्याने हा योग “शापित योग” किंवा “पिशाच्च योग” घडून येत आहे. आता याला पिशाच्च योग म्हणायचे कारण काय तर शनी जसा आयुष्य अथवा मृत्यू कारक ग्रह आहे तसा राहू हा पूर्वजन्म त्यातील कर्म याचा द्योतक आहे. राहू, केतू हे जन्म-पुनर्जन्म यांच्यामधील एक ‘पंप’ आहेत. राहू म्हणजे सर्पाचे तोंड तर केतू म्हणजे सर्पाचे धड व शेपूट पूर्वकर्मातील बऱ्या वाईट कर्माची फळे ज्ञानाच्या पोकळीतून केतूकडे पाठवून राहू ते भोगावयास भाग पाडतो. सहजच आपल्या मनात येते की असे काही घडायला नको होते पण राहू केतूचा महत्त्वाचा भाग म्हणजे हा राहू केतू हे पातबिंदू असले तरी त्यांच्यात १८० अंश अंतर असते, म्हणजेच ते पत्रिकेत समोरासमोरचे घरात असतात. त्यामुळे राहूची सातवी दृष्टी केतूवर तर केतूची सातवी दृष्टी राहू वर असते हे विसरून चालणार नाही. आता या ठिकाणी मीन राशि मध्ये राहू आहे. यामध्ये तो शनी बरोबर आहे म्हणजेच शनि आणि राहू या दोघांच्या सातव्या दृष्टीचे परिणाम समोरच्या घरात म्हणजेच कन्या राशीत भोगावे लागणार. तसेच निसर्ग कुंडलित मीन रास १२ व्या स्थानी म्हणजेच व्ययस्थानी येत आहे. व्यय स्थानाच्या बरोबर समोरचे प्रतियोगातील सहाव्या स्थानावर शनी आणि राहू यांची दृष्टी असणार आहे. अर्थातच आरोग्याला बाधक अशी ही दृष्टी असल्यामुळे हा एक ‘अशुभ योग’ होत आहे. ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेत अशी परिस्थिती आहे. त्यांना आरोग्याची काळजी घेणे आवश्यकच आहे. शनी आणि राहू यामध्ये राहू हा भ्रमित करणारा ग्रह आहे म्हणजेच बोलीभाषेत दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. तेव्हा जातकाने सावध राहूनच या योगाकडे बघणे आवश्यक आहे. फसवणूक, चोरी, आरोप, गहन नुकसान किंवा अतिशय चांगल्या व्यक्तीबरोबर अतिशय वाईट वितुष्ट अशा तऱ्हेचे परिणाम भोगावे लागतील. केवळ यासाठी शनि आणि राहुच्या युतीला ‘शापित योग’ किंवा ‘पिशाच्च योग’ म्हटले असावे. आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या ग्रंथातून याचा उल्लेख आहे पण हा तितकाच सत्य परिस्थिती बरोबर पूर्व जन्माशी निगडित असल्याने फक्त त्याला पिशाच्च किंवा काही ठिकाणी तर प्रेत योग संबोधलेले आहे. माझ्या मते प्रेत योग याचा या ठिकाणी म्हणजे आत्ताच्या शनी ग्रहाच्या व गोचर भ्रमणाशी काहीही संबंध नाही. जरी असे दिसत असेल की या शापित योगाच्या काळात काही वृद्ध व्यक्तींचे मृत्यू संभवतात.

मेदनीय परिस्थितीचे अवलोकन करता सर्व जगतात आकाशातील गृहस्थिती परिणाम करत असते. याचा अतिशय वाईट अनुभव आपण २०२० मध्ये, कोरोना साथीचे काळात बुध-राहूची जी अशुभयुती अंतराळात होती, त्याच्या परिणामने जे भोगावे लागले ते भयानक होते. अशा तऱ्हेची काही परिस्थिती जरी शनी-राहू मुळे, शनी राहूचे शापित योगामुळे उपस्थित होत असली तरी मीन राशीत इतरही चार ग्रह आहेत. त्यामुळे ही परिस्थिती सर्व ठिकाणी तेवढी वाईट होणार नाही. काही ठिकाणी हे परिणाम भोगावे लागतील याबाबतीत दुमत असण्याचे कारण नाही. काही आशादायक गोष्टी मी तुम्हाला या लेखात सांगत आहे. यासाठी अर्थातच ‘बृह्तसंहिता’, ‘ज्योतिष रत्नाकर’ व इतरही काही ग्रंथांचा किंवा काही ज्योतिर्विंदांचे लेख व सुप्रसिद्ध पुस्तकांचा अभ्यास करूनच मी हे लिहीत आहे.

आता या ठिकाणी इतर चार ग्रहांचे कसे सहकार्य मिळाले आहे ते आपण पाहूयात. यासाठी काही नमुना कुंडल्या मी दिलेल्या आहेत.

(कुंडली क्रमांक १, संदर्भ दाते पंचांग, रवी राशी कुंडली ) २९ मार्च २०२५ पहाटे, ५.३० वा. - मीन राशीत शनी प्रवेश होण्यापूर्वी रवी, बुध, शुक्र, राहू व नेपच्यून हे पाच ग्रह उपस्थित आहेत. आता २९ मार्चला शनी २१.४२ वा मीन राशीत प्रवेश करतो, त्यावेळीही हे पाच ग्रह तिथेच आहेत. या ग्रह स्थितीचे भय बाळगण्याचे कारण नाही, उलट हे ‘शापित योग’ किंवा ‘पिशाच्च योगाची’ तीव्रता कशी कमी करतात ते आपण पाहूया.

रवी आणि शनि हे पिता-पुत्र आहेत. जरी हे एकमेकांचे शत्रू असले तरी, नाते कुठे जात नाही. ज्या ज्या वेळी रवी-शनी एकत्र येतील त्या त्या वेळी शनि हा रवीला पोषक असेच काम करतो किंवा रवीच्या म्हणजे पित्याच्या आज्ञेत राहतो व रवी पुत्राला म्हणजे शनिला संभाळून घेतो. या युतीमुळे शनीचे कोपामुळे होणाऱ्या घटना तितक्या तीव्र होणार नाहीत. तसेच ज्या वेळी शनि आणि राहू एकत्र येतात त्यावेळी ते स्वतःच्या स्वतंत्र योगाचे महत्व व त्याची तीव्रता कमी करतात आणि काही ठिकाणी बरोबर उलट म्हणजेच चांगल्या योगासाठी एकमेकांना पूरक भूमिका घेतात. थोडेसे आश्चर्यकारक हे विधान वाटेल पण राहू हा कर्तुत्वाला, बुद्धीला चालना देणारा ग्रह आहे हे विसरून चालणार नाही. राहू म्हणजे सापाचे डोके या ठिकाणी जशी काही वेळेस फसवेगिरीची कामे राहू बुद्धीच्या जोरावर करतो तशी काही उत्तमोत्तम यशदायी अशी उत्कृष्ट कामे ही राहू बुद्धीच्या जोरावरच जातकाकडून करून घेतो. त्यातच शनीच्या युतीत असेल तर शिस्तबद्ध पद्धतीने जातकाची कामे अधिकच होतात. यामध्ये पुन्हा रवी हा शासक आणि सर्व ग्रहांचा राजा, कर्तुत्वाला वाव देणारा, बरोबर बुधही बुद्धिमत्तेला तेज देणारा आणि शुक्र हा धन, संपत्ती, कीर्ती, यश याचा वर्षाव करणारा असे हे ग्रह मीन राशीत एकत्रित असताना या शापित योगाचा तेवढा परिणाम गंभीर स्वरूपात होणार नाही हे निश्चित. दुसरे असे, की प्रत्येकाच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती नुसार या योगाचे साद पडसाद पडतील. तेंव्हा मनातले भय पूर्णपणे काढून टाका. साडेसाती असो पनौती असो त्याला धैर्याने सामोरे जा, कारण जरी का चवथा, आठवा, बारावा शनी येत असेल तरीही या तिन्ही राशी अग्नी तत्वाच्या राशी आहेत हे विसरून चालणार नाही. कर्तुत्ववान, धैर्यशील, पराक्रमी अशा या तीन राशी आहेत.

(कुंडली क्रमांक ३, उदाहरण - मेष राशीच्या अनामिक व्यक्तीची चंद्र कुंडली) मेष राशीचा स्वामी मंगळ, हा अचूक निर्णय क्षमता देतो. पराक्रम देतो. मात्र घाई घाईने निर्णय घेण्याची चूक करू नये. त्याचे चिन्ह मेष म्हणजे मेंढा म्हणजे अविचाराने कुठेतरी डोके आपटून घेणे हे होऊ शकते. ते होणार नाही याची काळजी घेणे. आता धनु राशि- धनु राशीचे चिन्ह आहे अर्धा भाग अश्वाचा आणि अर्धा भाग धनुष्य घेतलेला मनुष्य. ‘लक्ष्यावर’ ‘लक्ष’ ठेवणारी ही रास आहे. हातात तीर कमान आहे, नजर पूर्णपणे तीक्ष्ण व ध्येयावर रोखलेली आहे. उरलेला अर्धा भाग अश्वरूप म्हणजेच गतिमान, व धांवण्याच्या तयारीत आहे. अशा धनु राशीच्या पराक्रमी व्यक्तींनी चवथा शनी येतो आहे म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र अहंकार, उद्धटपणा, कामाची घिसाडघाई, व अनुभवी लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष या गोष्टी करू नयेत. थोडा शांत डोक्याने विचार करून, शिस्तबद्ध, चिकाटीने काम करावे. हे करून घेण्यासाठी शनिदेव येत आहेत, हे लक्षात ठेवावे. सिंह रास - ही राजाची रास आहे म्हणजेच जंगलच्या राजाची रास. ‘हम करे सो कायदा’ हे धोरण थोडे बाजूला ठेवा व अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती ही दूर ठेवा. मवाळ धोरण ठेवा. कार्यरत जरूर रहा मात्र इतरांच्याही अधिकाराची जाणीव ठेवून मिळते-जुळते घ्या, हे सांगण्यासाठी शनिदेवांची कंटक दशा येत आहे.

आपण चवथा शनी, आठवा शनी आणि बारावा शनी यांच्याबाबत माहिती घेतली. या ठिकाणी शनीची तिसरी, सातवी व दहावी दृष्टी कुठे येते हे ही लक्षात घेता येईल, शनि हा स्थानाला यश आणि दृष्टीला अशुभ परिणाम देतो. इतकेच लक्षात ठेवावे.

(कुंडली क्रमांक २, संदर्भ दाते पंचांग, . रवी राशी कुंडली ) रवी हा १३ एप्रिल रोजी मेषेत जात आहे. म्हणजेच १३ एप्रिल २०२५ ते १८ मे २०२५ हे दिवस थोडे धोक्याचे आहेत असे मानायला हरकत नाही. आता सर्वत्र परिणाम म्हणजे सर्व प्राणीमात्र, भूमी, पर्जन्य, वनस्पती या सर्वांवर होणारा परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे. या काळात उष्णतेमुळे आगी लागण्याचे, वणवा पेटण्याचे, अनुभव येऊ शकतात. इलेक्ट्रिक वस्तू किंवा विजेचे शॉक किंवा शॉर्ट सर्किट मुळे लागणारी आग या गोष्टी घडू शकतात. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वृद्ध व्यक्तींचे मृत्यू होऊ शकतात. यामधेही शासकीय नोकरीतील तसेच अधिकार पदावरील पूर्वी काम केलेले निवृत्त अधिकारी, किंवा सत्तेतील व राजकारणी सध्या वृद्ध अवस्थेतील नेते, नाट्य, क्रीडा क्षेत्रातील नामवंत, सुप्रसिद्ध वयस्कर व्यक्ती फक्त भारतात नव्हे तर सर्व जगात ज्यांचे नाव गाजले आहे किंवा गाजते आहे पण वृद्ध आहेत, अशांना निश्चितच हा काळ कठीण आहे व अशा व्यक्ती आपण गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तूर्त इथेच लेख संपवून पुढील लेखांक २ हा साडेसाती अथवा पनौती वर काही कुंडल्यांसह देण्याचा प्रयत्न करेन व उपासना ही दिली जाईल.



     रेखा छत्रे रहाळकर

    ज्योतिष विशारदभविष्य भूषण, 

हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ





No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...