कथा


 ''उपेक्षित- एका अनोख्या व्यक्तिमत्वाची कथा” ©

लेखिका- रेखा छत्रे रहाळकर

प्रस्तावना-

ज्योतिषशास्त्रावर आधारित कथा मालेतील दुसरे पुष्प 'उपेक्षित' ही कथा देत आहे. या पुर्वी प्रसिध्द झालेले प्रथम पुष्प “पुनर्जन्म एक सूडाचा प्रवास”, ही कादंबरी पेपरबॅक व इ-बुक आवृत्तीच्या स्वरूपात Amazon  Kindle वर उपलब्ध आहे.

सत्यकथांवर आधारित काल्पनिक कथाविष्कार, “पुनर्जन्म एक सूडाचा प्रवास” प्रमाणेच-  ज्योतिषाचे नजरेतून, ज्योतिषशास्त्रातील अनेक योग, तत्वे, ग्रह-गोचर परिणामांचे अनाकलनीय अनुभवांचे विष्लेषण हाच "उपेक्षित" या कथेचाही गाभा आहे ... तर या कथा मालेतून वाचकांनीही ही कथा वाचताना लेखिके बरोबरच ज्योतिषाची गूढतत्वे उलगडत जावे.


''उपेक्षित- एका अनोख्या व्यक्तिमत्वाची कथा”

भाग १

आनंद विहार टर्मिनस (दिल्ली) येथुन सकाळी ७ वाजून १० मिनिटाने निघालेल्या निलांचल एक्स्प्रेस मधे दुपारी एक वाजता कानपूर स्टेशन वर ती चढली. 2A (टु टायर एसी) खालचा बर्थ,जेवण करून निघाल्यामुळे आरामच करायचा होता. हातात जपमाळ पण बोटं मणि ओढत असली तरी लक्ष नव्हते तीचे. चेहरा तिचा ती ओळखु शकली नसती एवढा पडलेला. केवळ उदास किंवा खिन्न नाही तर खूप काही गमावल्याचे दु:ख. कदाचित जे गमावले ते आपले कधीच नव्हते ही झालेली अपमानास्पद जाणीव. तरीही जीव एवढा व्याकुळ का होतो? याची कासावीशी, चीडचीड जपाच्या मंत्राचे शब्द ही ओठातून उमटत नव्हते. तीने जपमाळ कपाळावर टेकवली, दोन्ही डोळ्यांना लावली. बटव्यात ठेवून दिली. पदराने डोळे पुसत, हुंदक्याने गदगदलेले नाक ओढून खसखसून पुसले आणि ती उशीवर डोकं टेकून आडवी झाली. थोड्याच वेळात डोळा लागला.

गौरीगंजला ४:३० ला चहा, रात्री वाराणसीला जेवण सारे यंत्रवत करत, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता ती जगन्नाथ पुरीला पोहोचली. थेट मंदिराजवळ धर्मशाळेत. रूम बुक केली होती. आश्चर्य वाटले ना? बाहेर दिसायला झोपडीवजा पण आत अतिशय आरामदायी असतात या धर्मशाळा. तिला पाहून स्वतः मॅनेजर पूढे आला. "मॉंजी आप? फोन किया होता, तो कॅब भेज देता ना? ज्योती दिदी नही आयी क्या? " त्याचे प्रश्न संपावे म्हणून तीने हाताने खूण केली "थांब". बुकिंग ज्योतीने दोघींचं केले होते, पण 'ज्योती+१,' एवढाच उल्लेख होता. त्यांचे नेहमीचं ठिकाण होते उतरायचे. त्यामुळे मॅनेजर ओळखत होता. त्याने रुम मध्ये सामान पाठवून नाश्ता विचारला. तेवढ्यात त्याच्याच लक्षात आले की मांजी अंघोळ करून, जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी आधी जाणार. त्याने सर्व व्यवस्था केली.’ नंतर विचारू ज्योतीदिदी बद्दल’ असा विचार केला.

ती मंदिरात पोहोचली तर फारशी गर्दी नव्हती. ती थेट आंत गेली. एवढ्या वेळ आणलेले उसने अवसान गळाले. तीने जगन्नाथाचे पायाशी लोळण घेतली. डोकं टेकवून ढसढसा रडली. मला नेमके जन्माला कशासाठी घातलेस सांग? म्हणत टाहो फोडला.. मंदिराचे पुजारी आणि इतर काही लोक पहात होते. पण त्यांना जशी संवय असावी अशा प्रकारची, ते स्तब्ध होते. थोड्याच वेळात ती सांवरली. प्रदक्षिणा पूर्ण करून प्रसाद ग्रहण करून ती परत आली.

"मला जेवण नको, आणि ज्योती एक, दोन दिवसात येईल" सांगून झोपायला गेली. डोळ्यापुढे चलत चित्रपट होता आठवणींचा, लहानपणापासूनचा. शिक्षण पूर्ण व्हायच्या आंतच आईवडीलांनी लग्न लावून दिलं. संसार सुरू झाला. दहा माणसांच्या घरात सासुरवाशीण वावरली. मुलं झाली. त्यांचं करण्यात स्वतः च्या आवडी निवडी विसरून गेली. हिचे अपुरे शिक्षण आणि नव-याचा तुटपुंज्या पगारात भागेना. तेंव्हा घरगुती खाद्यपदार्थ बनवून देवून चार पैसे जोडायला लागली. नणंदा, जावा, बहीणी अगदी सासुसह सर्वांनी नाकं मुरडत नांवे ठेवली. सहन केलं सारे मुलांसाठी, नव-यासाठी. तरीही एक दिवस कानावर आले, नवराच बाहेर नांवे ठेवत होता.

"शिकलेली नाही, नाही तर नोकरी मिळाली असती एखादी बॅंकेत, पोस्टात नोकरी करणारी हवी होती..."

गप्प झाली. काय बोलणार. एकदाच चाचरत म्हणाली, "लग्नाच्या वेळी अट तर नव्हती नोकरी करणारी हवी"!

"छे, छे नोकरी करणारी नकोच होती. मुलांना कोणी पाहीलं असतं, अग तूं घर सांभाळून एवढे कष्ट करून चार पैसे मिळवतेस तेच केवढं कौतुकाचे आहे, ना नोकरी साठी जा-ये चा खर्च, बाहेरच्या वापरायच्या साड्यांची खरेदी, कामाला बाई ठेवावी लागली असती, तीचा पगार हा सर्व वाचवणं आणि तरी घरून काम करून थोडी तरी संसारात मदत हेच खूप आहे माझ्यासाठी"

तिच्या मनात तेंव्हाच आलं होतं किती मतलबी आहे हा, सर्व हिशोब तयार आहेत, तरी बाहेर लाज वाटते सांगायची की बायको खाद्य पदार्थ बनवून देते. तीने बोलून नाही दाखवलं तरी दुखावली होती, एस्.एस्.सी तर होती ती, तीने मॉंटेसरी शिक्षिका म्हणून कोर्स केला. एका बालवाडीत नोकरी ही मिळाली. तीन तास जेमतेम, पण तिचा आत्मविश्वास वाढला. शिवाय खाद्य पदार्थ बनवून देत होतीच.

आज ती विचार करत होती. सांगावं का त्याला? मुख्याध्यापिका वीणा ताईंनी तिला ‘डी. एड कर’ सुचवले होते. खर्च, वेळ, अभ्यास कसा होणार? सर्वच प्रश्न होते. तो नाहीच म्हणणार खात्री होती तीला पण तीचा अंदाज चुकला त्याने प्रोत्साहन दिले. अगदी उत्साहाने, "गणित, विज्ञान आणि इंग्रजीचा अभ्यास पण करुन घेईन तुझा. त्यासाठी क्लास नको लावूस" म्हणाला. ती तेवढ्यात ही खूष झाली. उत्साहात तीने मुख्याध्यापिका वीणा ताईंना सांगितले. अभ्यासक्रम सुरू झाला. हिची तारेवरची कसरत होत होती. सकाळी लवकर उठून त्याचा डबा सर्वांना नाश्ता, नंतर मुलांना तयार करून जेवायला घालून शाळेत पोहोचवणे मग स्वतःची शाळा, संध्याकाळी परत सर्व कामे करत येई, आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरवात. मुलांच्या गप्पा सकाळ पासून शाळेत काय झाले, त्यातच टिव्ही वर कार्यक्रम पहायला मुले शेजारी-पाजारी जात. घरात टि.व्ही नव्हता. कमीपणा वाटायचा पण बोलायची सोय नव्हती. ती गप्प रहायची.

डी.एड जिद्दीने पूर्ण केले तिने. नव-याने खरोखरच मनापासून सहकार्य केले होते, तिला फर्स्ट क्लास मिळाला...आणि त्याने सांगितले ‘तूं आता बी.ए कर मुलांकडे मी पाहीन’. शाळेत ही तिला वरचे वर्ग शिकवायला मिळाले, थोडा पगार वाढला. आता तिने खाद्य पदार्थ बनवून देणे बंद केले. मुलांचा अभ्यास घेणे व स्वतःचा अभ्यास यात गुंतून गेली ती. ना कुठे हिंडायला जाणे, ना सिनेमा नाटक आणि ट्रीप या गोष्टी आपल्या साठी नाहीतच समजूत काढली मनाची.

क्रमश: भाग २ -मुख्याध्यापिका

 

भाग २ - मुख्याध्यापिका

ती मंदिरातून परत आली तेव्हा मॅनेजरने रात्रीचे जेवणाबद्दल विचारले तर ‘मला जेवण नको आणि ज्योती एक-दोन दिवसात येईल सांगून’ ती रूम कडे गेली. झोपायचा प्रयत्न करूनही झोप येत नव्हती. अनेक वर्षांच्या आठवणी मनात गर्दी करून होत्या. स्वतःच्याच मनाशी ती कित्येक वर्षात बोलली नव्हती. आता तिला एकटं राहून शांतपणे मनाशी मनसोक्त बोलायचे होते.

जगन्नाथाच्या दर्शनाला आलं की जगन्नाथ खाली ‘हात पाठवीत’ नाही. कोणी भुकेला परतत नाही. तिथला एक अलिखित नियम आहे, की दर्शनाला येणारा ‘महाप्रसाद’ ग्रहण करूनच परततो. तीही महाप्रसाद घेऊनच आली होती. आता पहाटे पाच पर्यंत फक्त गप्पा! स्वतःच्या, स्वतःशीच. तिला हसू आले. ती अबोल तर नव्हती पण बडबडी ही नव्हती. फारशा मैत्रिणी ही नव्हत्या. सहकारी, शाळेतल्या इतर शिक्षक शिक्षकांचे बरोबर दिवसभरात होतील तेवढ्याच गप्पा. कधीच महिला मंडळ, भजनी मंडळ या कशा कशातही भाग घेऊ शकली नाही. वेळच नव्हता यासाठी. शाळा ते घर,घर ते शाळा एवढाच प्रवास होता तिचा. जेंव्हा तिला नवऱ्याने सांगितले, "तू बी.ए कर," तिच्यापुढे प्रश्नचिन्ह होते ‘कसे करायचे?’ नोकरी सांभाळून कसे जमणार? पण शरदने, तिच्या पतीने निर्णय देऊन टाकला नोकरी सोड. बी ए झालीस की परत नोकरी कर. तिला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के होते हे. ती डी.एड करत असतानाही त्याने केलेली मदत, अगदी घर कामात सुद्धा! ती संकोचून जायची ‘आपण उगीच वाईट समजत होतो याला’ मनातल्या मनात कबुली द्यायची. त्याच्या पाठबळामुळेच नोकरी सांभाळून ती डी.एडला क्लास मिळवू शकली होती. आता डी.एड मुळे तिला डायरेक्ट बी.ए करणे जमणार होते. ती मात्र पाय मागे घेत होती, नोकरी आणि बी.ए दोन्ही नाही जमणार म्हणत. त्यात मुलांचाही अभ्यास घ्यायचा. धाकटी ज्योती चौथीला, उदय ७वीला तर प्रकाश नववीला होते पण ‘मुलांच्या अभ्यासाची चिंता तू करू नको‘, शरद पुन्हा पुन्हा सांगत होता. शेवटी त्याचे ऐकून तिने नोकरी सोडली आणि बी.ए पूर्ण केले. घरात आनंदाला उधाण आले होते. तिला बी.ए ला फर्स्ट क्लास, तर मुलेही खूप चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. प्रकाश एस. एस. सी झाला, त्याला इंजीनियरिंग करायचे होते. अकरावी -बारावीला चांगले मार्क्स घ्यायलाच हवेत तेव्हाच इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल. डोनेशन तर भरणे शक्य नाही. धाकटे दोघेही उदय आणि ज्योती स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यामुळे करिअर मध्ये मागे राहू नयेत, यासाठी पैशाची तरतूद करायलाच हवी होती. तिने नोकरीसाठी अर्ज टाकायला सुरुवात केली. मराठी, हिंदी प्रमाणे इंग्रजी वर ही प्रभुत्व असल्यामुळे तिला एका प्रायव्हेट कंपनीत पब्लिक रिलेशन ऑफिसरची नोकरी मिळाली तर एका ठिकाणी वृत्तनिवेदक ही पोस्टही मिळत होती. तिच्यापुढे करिअरची संधी होती, निर्णय तिला घ्यायचा होता आणि तिने कंपनीची पब्लिक रिलेशन ऑफिसरची पोस्ट घेतली. तसही तेव्हा कंपनीसाठी पि. आर.ओ हे कंपनीचे मार्केटिंग ऑफिसरचे काम करीत. कंपनीचे नाव बाहेर कसे होईल यासाठी कंपनी प्रोडक्ट्सच्या नवनवीन जाहिराती देणे, वृत्तपत्रात कंपनीचे रिपोर्ट छापून आणणे, वेगवेगळे अधिकारी, समाजसेवक, शासकीय अधिकारी यांचे बरोबर कंपनीचे व्यवहारात जबाबदारीने भेटीगाठी घेणे- तिचे विश्वच बदलून गेले. पगारही उत्तम होता. आता प्रकाशच्या शिक्षणासाठी ती पैसे शिल्लक ठेवू शकणार होती. पाठोपाठ उदय आणि ज्योती यांचे नंबर लागणारच होते. आता निदान दहा वर्षे मागे फिरायचे नाही तिने मनाशी ठरविले.

सहजच शरद बरोबर एकांतात गप्पा करताना एकदा तिने त्याला विचारले “आता कसं वाटतंय… बायको चांगल्या प्रख्यात कंपनीत ऑफिसर आहे. बँकेत किंवा पोस्टातल्या नोकरीत कितीशी मजल गेली असती पगाराची?” त्याने तिचं नाक पकडून सांगितले होते “फुशारकी मारू नकोस, माझ्या मदतीमुळेच करू शकलीस तू हे. नाही तर, बसली असतीस पापड, लोणची, नाहीतर दिवाळीचे पदार्थाच्या ऑर्डर घेत” ती हसून तरी मुद्दा रेटत म्हणाली, “पेपर तर डी.एड काय किंवा बी.ए काय मीच लिहिला ना? क्लास मीच मिळवला ना? कधीतरी कौतुक कराल? श्रेय द्याल?” तो खांदे उडवत म्हणाला होता “तुम्ही बायका म्हणताना, जात्यावर बसले की ओवी सुचते” पुढे तो हेही म्हणाला “मी अभ्यास घेतला नसता तर डी.एडला पास तरी झाली असतीस का नाही शंका आहे” मग मात्र तीही संतापली होती. ‘याच्याशी विनोदाने बोलण्यातही मतलब नाही’ मनाला बजावले तिने ते कायमचेच.

तिला नोकरी‌ लागून जेमतेम सहा महिने झाले असतील एक दिवस तो ऑफिस मधून घरी आला तोच मिठाईचा बॉक्स घेऊन. आंघोळ करून, देवापुढे मिठाई ठेवून, नंतर सर्वांना मिठाई देत त्याने सांगितले त्याचे प्रमोशन झाले होते. ‘डिव्हिजनल मॅनेजर’ म्हणून पण बदली ही झाली होती, नागपूरला. तिलाही आनंद तर खूप झाला पण ती जमिनीवर आली त्याच्या निर्णयाने. “नोकरी सोड, प्रकाशला हॉस्टेलला ठेवू. उदय व ज्योतीला नागपूरच्या शाळेत घालू” सगळेच गप्प झाले त्याचे बोलण्याने. प्रकाश शांततेचा भंग करीत म्हणाला “बाबा अभिनंदन! … पण इतका तडका फडकी निर्णय नको घ्यायला. आपण विचार करू. मी नाही होस्टेलला राहणार. ११वी, १२वीचा अभ्यास खूप करायचा आहे” ती तर तिथून उठूनच गेली. तिच्या करिअरला किंमतच नव्हती. तो म्हणेल तेव्हा नोकरी करायची आणि तो म्हणेल तेव्हा सोडायची. पुन्हा तिचे मन म्हणाले, ‘त्याच्या प्रमोशनचे कौतुक व्हायला हवे, त्याचा जॉब, त्याचे ऑफिस, मी त्याच्या पाठीशी असायला पाहिजेच. सोडेन मी नोकरी. नाही तरी त्याच्यासाठीच धरली!’ तिने डोळ्यातले पाणी पुसले. परत तो होता त्या रूममध्ये आली. मुले हिरमुसली होती. तिने मिठाईचा बॉक्स घेतला. स्वतःच्या हाताने त्याला पेढा भरवला “मनःपूर्वक अभिनंदन साहेब! मी येईन तुमच्या बरोबर नोकरी सोडून” मुलांना पण पेढा भरवत ती म्हणाली “आपण सगळेच जाऊ नागपूरला. प्रकाश, तू सुद्धा. नाही तरी अकरावी हे ‘रेस्ट इयर’ आणि बारावी ‘बेस्ट इयर’ असते. नको काळजी करू” प्रकाशला प्रश्न सुटला वाटले. शरदने तर तिचा शेपटा ओढून म्हंटले “बस, बायको हवी तर अशी“ ती काही बोलणार तोच, तो परत म्हणाला “शेवटी पसंत कोणी केली आहे… माझी निवड चुकणारच नाही“ तिच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले ‘एक’ …’एक टक्का क्रेडिट द्यायचे नाही कुणाला, आता मुले एवढी मोठी झाली तरी मला पसंत केल्याचे क्रेडिट या निमित्ताने. मग कशाला म्हणायचं बायको हवी तर अशी?’ तिने गप्पच राहायचे ठरवले.

सकाळी ऑफिसला जायचे होते. शरद ही ऑफिसला गेला मात्र त्याने अकरा वाजता तिला फोन केला, “अर्धा दिवस रजा टाकून निघशील का? माझे काही सहकारी घरी येणार आहेत” “कसे शक्य आहे? माझी एक मीटिंग आहे चार वाजता” “पोस्पोन कर. नाहीतर कॅन्सल कर. तुला कुठे फार दिवस नोकरी करायची आहे…”   “अहो पण साहेबांनी ठरवली आहे मीटिंग. मला हजर राहायलाच हवे आणि जोवर नोकरीत आहे तोवर नोकरी व्यवस्थित करायलाच हवी” ती बोलत होती. पलीकडे फोन आपटल्याचा आवाज आला. ती दुखावली गेली. पुन्हा एकदा ती कोणीच नव्हती त्याच्या लेखी. तिच्या सुदैवाने ती मीटिंग पुढे ढकलली गेली आणि तिला हायसे वाटले. मग मात्र रजा टाकून ती घाई गर्दीत घरी आली. तो घरी पोहोचला होता. त्याने हॉटेल मधून काही जिन्नस मागवले होते आणि तो ड्रॉइंग रूम आवरत होता. घुश्शातच होता. खूप मिन्नतवारी नंतर तो बोलला. त्याचे दोन सहकारी पत्नीसह येणार होते. त्याने तिला टोकलेच “आता आत जा. नीट स्वतःचे आवरा. काकूबाई सारखे घरात राहायची गरज नाही. मिटींगला, नोकरीला जाते ना तशी स्मार्ट दिसशील अशी तयार हो”. संध्याकाळी, शरदचे सहकारी सहकुटुंब आले आणि तिला धक्काच बसला. वीणाताई, ज्या शाळेत ती पूर्वी नोकरी करत होती तिथल्या मुख्याध्यापिका त्यांचे पती, प्रभाकर, शरदचे सहकारी होते. ती विचार करत होती,

तोच त्यांनी खुलासा केला की ‘तेव्हा त्यांचे पती शरदचे सहकारी नव्हते. डिपार्टमेंट चेंज झाल्यावर ते दोघे एकत्र आले होते’

ती नि:श्वास सोडणार तोच दुसरा धक्का तिला बसला, शरद आणि वीणाताई ‘क्लासमेट‘ होते. दोघे एकमेकांना ‘एकेरी‘ संबोधत होते. हसत, खेळत गप्पात संध्याकाळ संपली. सर्व घरी गेले आणि शरद आणि ती दोघेच उरले ड्रॉइंग रूममध्ये.

ती फणकारून बोलली “पूर्वी कधी नाही सांगितलेत वीणाताई तुमच्या क्लासमेट होत्या”

“उगीच डोक्यात राख घालू नको. तू नोकरीत असताना मी कधी भेटलो तिला?”

“मग कधी भेटला?”

“प्रभाकर माझ्या डिपार्टमेंटला बदलून आला तेव्हा एकदा घरी गेलो होतो त्यांच्या पण तेव्हाही ती कधी बोलली नाही की तू तिच्याच शाळेत होतीस… राईचा पर्वत करायची खोड सोड आता” तोही फणफणत होता.

“मी कुठे राईचा पर्वत केला? इथे तुम्ही एकमेकांना ‘आरे तुरे’ करून बोलताना पाहिल्यावर खटकलं म्हणून विचारलं“

“क्लासमेट, साधे क्लासमेट होतो. डोक्यात कुठले किडे घेऊ नको. जायचंय आपल्याला लवकरच इथून” ..........

आज हे सगळं आठवताना तिला थकायला झाले. तिने मनाला बजावले ‘उद्या परत देवळात आणि एक दोन ठिकाणी जायचं विसरून चालणार नाही’ मुख्याध्यापिका वीणाताईंना तिने मनाच्या एका कप्प्यात बंदिस्त केले आणि ती निद्राधीन झाली.

क्रमश: भाग ३- “भविष्य नेमकी काय असते”- दोन अनोळखी व्यक्तींना लग्न गाठीत बांधून मोकळे होते!


भाग ३- “भविष्य नेमकी काय असते”-

दोन अनोळखी व्यक्तींना लग्न गाठीत बांधून मोकळे होते!

पहाटे ४-४:३० वाजता उठून स्नान करून, फक्त चहा घेवून ती देवळात जायला निघाली. अक्षरश: चालत जावून ३-४ मिनिटाचेच अंतरावर देऊळ असल्याने, ती रमत गमत चालत व सकाळच्या ताज्या हवेचा आल्हाददायक अनुभव घेत देवळात पोहोचली. देवाची पुजा सुरू होत होती. जगन्नाथ मंदिरात येणारे भक्तगण ही संधी कधी सोडत नाहीत. पहाटे जगन्नाथ, बलराम व भगिनी सुभद्रा या तीनही भावंडांच्या पूजेचा सोहळा अलौकिक असतो. एकतर उजाडते खूप लवकर. मंदिराचे आवारही विस्तिर्ण आहे.क्षकधी अगदी गोड आवाजात भक्तीगीते, भजने ऐकू येतात. तर कधी विविध पक्षांचे सूर, त्याचे माधुर्य वेगळेच. ती एका चौथ-यावर बसली. ती नेहमीच येत असल्याने तिच्या परिचयाचा होता सारा परिसर. कधी पक्षांचे मंजुळ गाणे तर कधी धीरगंभीर समुद्राचे खर्जाचे सूर, कधी भक्तांचि अंत:करणाला साद घालणारी आर्त गीते. या सा-याचे तिला नवल वाटे. ”एकटा जगन्नाथ तो, कोणाकोणाचे ऐकेल?ॱॱ असा मजेशीर विचार पूर्वी तिच्या मनात यायचा पण आज नाही आला. इतर भक्तांसारखीच थोडी अप्पलपोटी भावना भक्तीरसात होती. इतरांच्या आधी जगन्नाथाने माझे ऐकावे. माझे दु:ख समजून घ्यावे. पूजेचे वेळी जगन्नाथावर तिची नजर खिळलेली होती. जगन्नाथाने ही ओळखले असावे, ”पक्का इरादा करून आली आहे.” त्याच्या चेह-यावर तेच मनमोहक स्मितहास्य होते. ती मात्र एकटक बघून मनातल्या मनात त्याला सांगत होती. ”सा-या जगाचि काळजी करतोस, मी नाहीच दिसले कां कधी? कां तुझ्या दृष्टीने ही मी कोणीच नव्हते कधीच.”आरतीचे तबक समोर आले, तीने ते हातात घेवुन जगन्नाथाला, बलराम व सुभद्राला ओवाळल. .कानातल्या कुड्या काढून सुभद्रादेवीचे पायाशी ठेवल्या, अंगठी बलरामाला वाहिली. .पुजा-याने दोन्ही दानपेटीत ठेवले. तेवढ्यात तीने एक थैली जगन्नाथाचे पायाशि ठेवत म्हटले “जगाचा नाथ तूं मी काय देणार तुला ?” पुजा-याकडे वळून तीने सांगितले “आजचा महाभोग माझ्याकडून”. पावती फाडण्यासाठी तिचे नाव विचारल्यावर ती म्हणाली “ देवाला ठाऊक आहे आणि मला पावतिची गरज नाही”.

ती दर्शन घेवून निघाली ती थेट समुद्र किनारी! बराच वेळ त्याच्याकडे पहात उभी होती. नंतर परत फिरली सावकाश पाऊले टाकत गेस्ट हाऊसला परत आली बाहेर गार्डन मधेच बसली. मॅनेजरने पाहिले. काल आल्यापासून मॉंजी गप्प आहेत. त्याने टेबलाशी येवुन चौकशी केली. “दिदी केंव्हां येणार?” प्रकृतीचि चौकशी करून तिच्यासाठी नाश्ता सांगून तो थोडा वेळ गप्पा करून परत गेला. ती विचार करीत होती. जगात दोन माणसे केंव्हा? कुठे ? काय कारणाने भेटतील सांगता येत नाही.

बालपण कोल्हापुरमधे, लग्न होवून ती सासरी आली पूण्याला. पतिच्या नोकरी निमित्त बि-हाड ठाण्याला. घराबाहेर ही न पडणारी ती, आधी साधी मॉंटेसरी शिक्षिका काय झाली. करिअरचि गाडी रूळ बदलत धांवतच होती. तिला थांबणे माहितीच नव्हते. तिला आठवलं “फडतरे ज्योतिषींचि भेट घेतली नसती तर? आपण नागपूरलाच असतो कां?"

शरदने प्रमोशन ट्रान्सफरची बातमी दिली. आनंदावर विरजण पडू नये म्हणून तिनेही विचार केला जाऊ सर्वजण नागपूरलाच. तरीही प्रत्यक्षात या घडीला काय शक्य आहे यावर विचार करताना तिला शेकडो प्रश्न पडले होते. तिला नोकरी सोडावी लागणार म्हणजे उत्पन्नाचे साधन जाणार की ज्याची अतिशय आवश्यकता आहे, मुलांच्या शाळा बदलणे म्हणजे त्यांच्या अभ्यासावर परिणाम त्यातही मुख्यत्वे प्रकाशची महत्त्वाची वर्षे असताना, नवीन जागेत एकदम जाताना जवळ आहे ते एवढी वर्षे कष्टाने जे मिळविले ते सोडावे लागणार. नाही म्हंटले तरी १८-२० वर्षे झाली त्यांच्या लग्नाला आणि ठाण्यात मालकीचा फ्लॅट होता, पै पै जमा करून घेतलेला. शेवटी विमनस्तक मनस्थितीत तिने ज्योतिषाचा सल्ला घ्यायचे ठरवले. श्री फडतरे ज्योतिषी तिला माहिती होते. ती सर्वांच्या पत्रिका घेऊन त्यांच्याकडे गेली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले "नोकरी सोडू नका तुम्हाला खूप चांगले करिअर आहे… अर्थात हीच नोकरी कायम आहे असे नाही पण तुम्ही आत्ता जात नाही नक्कीच. शरद रावांना जाऊ देत. त्यांनाही चांगले ग्रह आहेत पण मुलांसह तुम्ही इथेच राहणे योग्य आहे. सद्यस्थितीत पती-पत्नीत दुरावा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण दोघे सुशिक्षित आहात प्रेस्टिजचा प्रश्न नाही केलात तरच संसार टिकेल. षडाष्टक योग आहे" बाकी जास्त सांगण्याचे त्यांनी नाकारले पण तिच्या विचाराला दिशा मिळाली. निदान दोन वर्षे शरदने नागपूरला व तिने ठाण्यात राहावे. प्रकाशची बारावीची परीक्षा झाल्यावर कॉलेज कुठले मिळते त्यावरही अवलंबून ठेवावे. पती-पत्नीत चर्चा वादा-वादी, सर्वकाही झाले पण निर्णय मान्य करणे शरदलाही पटत होते आणि तो एकटाच नागपूरला गेला. सुरुवातीला सर्व जबाबदाऱ्या सांभाळणे तिला अवघड गेले पण मुलेही मोठी होती समजूतदार होती हळूहळू घडी बसत गेली.

क्रमशः भाग ४था - चुकून जरी निखाऱ्यावर पाय पडला तरी पाय भाजतोच

 

भाग ४- चुकून जरी निखार्‍यावर पाय पडला तरी पाय भाजतोच ना !

दुपारची विश्रांती घेऊन ती जागी झाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. “अंमळ उशीरच झाला” म्हणत तिने चहा नाश्ता मागवला आणि पटनाईक यांच्याकडे जाण्यासाठी ती तयार झाली. पटनाईक हे तिचे पूर्वीच्या नोकरीतील सहकारी व नंतर आता व्याही होते. जेंव्हा ती पब्लिक रिलेशन ऑफिसर होती, तेंव्हा श्री.पटनाईक त्याच कंपनीत सीनियर मॅनेजर होते. ते बांद्रा येथे राहत. त्यांची मुले प्रकाश व उदयच्याच वयाची होती. शरदची नागपूरला बदली झाल्यावर, ती नोकरी सोडण्याचे विचारात असताना पटनाईकांनीच तिला “नोकरी सोडू नये” सल्ला दिला होता. करिअरमध्ये तिला पुढे संधी होती. एवढेच नव्हे तर तिने डी.बी.एम्. किंवा डी. एम्.एम्. वगैरे कोर्स करावेत, असाही सल्ला त्यांनी दिला होता. तिच्या दृष्टीने कोर्सेस करणे तर विचारात बसतच नव्हते. ‘आपण मुलांच्या दृष्टीने नोकरी टिकवून पैसा शिल्लक ठेवावा’ हे मात्र तिच्या मनात पक्के होते. मुलांना संभाळून नोकरी करताना पटनाईक कुटुंबाचे तिला खूप सहकार्य झाले. शुभदा पटनाईक तर तिची मैत्रीण झाल्या. मुलांना ये जा करायला एक नवे ठिकाण, नवीन मैत्रीचे नाते मिळाले. शुभेंदू, त्यांचा मुलगा आणि प्रकाश दोघे एकाच कोचिंग क्लासला जात होते. बघता बघता दोन वर्षे संपली. ९०-९२ टक्के मार्क्स घेऊन दोघे बारावी उत्तीर्ण झाले. दोघांनी आय.आय.टी. ची तयारी केली होती.

कधी शरदने ठाण्यात यावे तर कधी तिने मुलांसह नागपूरला जावे. जीवाची घालमेल तर कधी पैशाची ओढाताण. सारा शीण सार्थकी लागला. आता तयारी करायला हवी होती, ती प्रकाशच्या पुढील शिक्षणासाठी. ती आता नोकरीत कायम झाली होती. थोडाफार पगारातही फरक पडला होता. शरदचे मात्र ‘एकटं राहावं लागतं’ ही भूणभूण होती. किती जरी प्रकाशच्या यशाचा आनंद झाला. तरी “मी तिकडे राब राब राबतोय, जेवणही स्वतः बनवतोय. कोणाला किंमत नाही” हे त्याचे ‘तुणतुणे’ सुरू होतेच.

प्रथमच चांगली पंधरा-वीस दिवसांची सुट्टी घेऊन ती, उदय व ज्योतीला घेऊन नागपूरला गेली. मुलांना सुट्ट्या होत्या. प्रकाशला आयआयटी मध्ये ऍडमिशन मिळाली होती. नागपूरला दोन खोल्या होत्या. तिने नवीन संसारासारखे स्वयंपाक घर सजविले, असताव्यस्त घर नीट आवरले. त्याची पुस्तके, कागदपत्रे डायऱ्या नीट लावल्या. खोलीत भिंतीतच कपाटे होती…आणि नको तेच तिच्या नजरेला पडले. एका पाकिटात बंदिस्त पत्रे होती. खूप खूप जुनी पत्रे होती.. सहज काय असेल म्हणून तिने पाकीट उघडून पाहिले. तिला धक्क्यावर धक्के बसले, डोके गरगरले. घाई घाईने पाकीट पूर्ववत बंद करण्यात ती यशस्वी तर झाली, पण हिरवळीत चालताना पायात कांटा घुसावा किंवा चालताना कुठेतरी नकळत निखाऱ्यावर पाय पडावा, अशी तिची अवस्था झाली. डोळ्यात पाणी येऊ द्यायचे नव्हते. ‘काही काही समजलेच नाही’ हे दाखवायचे होते. पण तेही तिच्या नशिबात नव्हते. तिने घर आवरले ,स्वतःचेही आवरून तो यायच्या वेळेला हसतमुख राहण्याची रंगीत तालीमही करून झाली. मुले शेजारी गेली होती. नवीन ओळखी झाल्या होत्या. तो आला. बरोबर एक स्त्री होती.. तिने मनाला बजावले “चूप! काही आवाज करायचा नाही. काही घडले नाही!”

शरदने माधवीची ओळख करून दिली “ही माझी कॉलेजमध्ये मैत्रीण आणि आता ऑफिसमध्ये सहकारी. चहा पाणी झाले, माधवीला सोडायला तो गेला. जवळजवळ तास दीड तासाने परतला. रात्री तिने विषय काढलाच. “किती योगायोग ना? कॉलेज मधली मैत्रीण एवढ्या वर्षांनी भेटली तुम्हाला?” तो डोळे मिचकावत म्हणाला “लक! निव्वळ लक! लाऽख त्यावेळी माझ्या घरच्यांनी विरोध केला, तिच्याशी लग्न करू दिले नाही. आयुष्यात तिला भेटायचे नाही वगैरे आणा भाका घातल्या आईने. तरी भेट घडवणारा तो वर बसला आहे.” “ओह्! तुमच्या मनाविरुद्ध लग्न झाले? असे कधी बोलला सुद्धा नाही. इतकंच नव्हे, तुमच्या वागण्यात सुद्धा कधी जाणवलं नाही!” तिला कवटाळत तो म्हणाला “तुला पाहिलं आणि विसरलो तिला. स्वतःवरच खुश झालो. शंभरदा मनाला बजावलं… ‘बेट्या नशीबवान आहेस, आता माधवीची आठवण सुद्धा पुसून टाक’” शरद सराईतपणे बोलत होता. तिला मात्र उबग आला. ‘किती निर्लज्ज आहे हा! मग ती पत्रे का जपून ठेवली आहेत?’ हे विचार करत ती उसासे टाकत गप्प बसली. त्याच्या गडगडाटी हास्यात आणि तिच्या विचारचक्रात रात्र संपली.

माधवी लग्न करून अमरावतीत आली होती. सासर अमरावतीचे. नंतर नागपूरला आली. तिचा पती मोठ्या हुद्द्यावर होता. ती ही नोकरी करीत होती. तिला एक मुलगा होता, तो कॉलेजमध्ये शिकत होता. एवढी माहिती पुरेशी नव्हती म्हणून की काय तिला शरद कडून हेही कळले की माधवीचे व तिच्या नवऱ्याचे पटत नव्हते.

तो विषय तिथेच तिने संपवला. अनेक प्रश्नांची भेंडोळी घेऊन ती मुलांसह मुंबईस परत आली होती. मुलांच्या शाळा आणि नोकरी यात तिला सर्व विसरायलाच हवे होते. वेडे मन ऐकत नव्हते. पुन्हा एकदा ती सर्वांच्या पत्रिका घेऊन, फडतरे ज्योतिषी यांचे कडे गेली. आता तिला तिच्या संसाराच्या आणि मुलांच्या भवितव्याची काळजी लागली होती. फडतरे यांनी तिला अनेक ग्रहयोग कसे विरोधात आहेत, हे तिची व शरदची पत्रिका पाहून विश्लेषण करून सांगितले. शरदच्या पत्रिकेत सप्तमात राहु, मंगळ युती होती. तर तिच्या पत्रिकेत चतुर्थात शनी चंद्र युती होती. काही पाप ग्रहांची दृष्टी आणि षडाष्टक योग यामुळे वैवाहिक सौख्य नसल्याचे पत्रिका दर्शवित होती. गेली वीस वर्षे तिचा संसारही संघर्षमय झाला होता. फडतरे यांनी तिला हेच सांगितले “ज्याला नाते निभवायचे आहे, त्याची आयुष्यभर फरफट होते” ”शरदच्या आयुष्यात दुसरी स्त्री कायम असणार” हे ही फडतरे ज्योतिषांनी स्पष्ट केले… तीनेही निश्चय केला “मी संसारही मोडू देणार नाही, मुलांना एकटे पडणार नाही, आणि माझी फरफट ही होऊ देणार नाही!” …

काळ पळत होता, काळा मागे आणि काळाबरोबर ती धावतच राहिली. दमेपर्यंत धांवली. प्रकाश आणि उदय इंजिनीयर झाले. ज्योती पोस्ट ग्रॅज्युएट झाली. ज्योती आता ती पटनाईकांची सून होती. शुभेंदू व ज्योतीचा प्रेमविवाह होता. शुभदा, तिची विहीण होती. व्याह्यांचे घरी राहायचे नाही म्हणून नेहमीच ती जगन्नाथपुरीच्या धर्मशाळेत उतरत होती. असे नाते झाले होते तिचे जगन्नाथपुरीशी!

क्रमशः भाग ५- जगन्नाथपुरीशी अतुट नाते…


भाग ५-  जगन्नाथपुरीशी अतुट नाते –

कोणार्क सूर्य मंदिराची ओढ

पटनाईकांचे घरी ती भेटायला गेली. सकाळी लवकरच पोहोचली. तिने आधी कळवून ठेवले असल्याने पती-पत्नी दोघेही तिची वाट पाहत होते. रिटायरमेंट नंतर ते आपल्या मूळ गावी येऊन स्थायिक झाले होते. मुलांची लग्नकार्य झाली होती, आता तर नातवंडे ही मोठी होती. शुभेंदू आणि ज्योती लग्नानंतर काही वर्षे परदेशात होते पण आता शुभेंदू, कानपूरला होता. ती पटनाईकांचे घरी पोहोचली तेव्हा किती म्हटले तरी चेहरा तणावग्रस्त होता. गेटमधून ती आत आली, शुभदा निरखत होती तिला. शुभदा पेक्षा तशी ती  वयाने लहान. शुभदा आता ६०/६२ वर्षाची होती मात्र ती जेम तेम ५५/५६ ची असून थकलेली दिसत होती. तिला हाताला धरून शुभदाने आत आणले. तिची कळी खुलावी म्हणून हसत म्हणाली, “हे बरे नव्हे हां, तू माझ्यापेक्षा लहान आहेस. विहिणी झालो म्हणून काय झालं, इतकं औपचारिक होणे शोभत नाही बघ तुला” ती आता मात्र मनमोकळं हसली आणि तितक्याच थट्टेच्या स्वरात म्हणाली, “मला नक्की सांग, मी विहिणीकडे आले आहे की ‘वहिनी’कडे आले आहे?” पटनाईक साहेबांना ती भाऊ मानत होती. शुभदा कुठे बोलण्यात कमी होती तीचे उत्तर तयार होतेच. “वहिनीच्या घरात जेवलीस माहेर समजून, भावाच्या घरी मुक्काम केलात तर स्वागतच आहे नणंदेच” एवढा वेळ दोघींच्या गप्पा ऐकत असलेल्या पटनायक साहेबांनी संधी सोडली नाही “अहो, आधी बहीण, तीही धाकटी. ‘दादा, दादा’ म्हणत लाड करून घेतले. हलकेच भाचा पळवला जावई करून घेऊन. आता विहीणबाई!... पण वागतात परक्यासारखं. गावात येतात आणि धर्मशाळेत उतरतात. ती एकदम गोरी गोरी झाली तरी उसनं अवसान आणून म्हणाली, “छान, मुलगी पळवली तुमच्या लेकाने … आणि दादा सांगा बरं, आज तुम्हाला सून लाडकी आहे ना? गुणाची पोर माझी सगळं करते ना व्यवस्थित?” आता शुभदाची टर्न होती,  छान गुणाची सून आहे माझी! शुभेंदूची निवड चुकणारच नाही.” अशा खेळीमेळीच्या वातावरणात संध्याकाळ झाली. तिने त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू त्यांना दिल्या. काही पुस्तके खास पटनायक साहेबांसाठी आणली होती, त्यांना तर खूप आनंद झाला. नंतर तिने एक कोरीव चंदनी पेटी शुभदा कडे दिली. “ज्योतीची आणि माझी भेट होईल वाटत नाही. मी तर उद्या कोणार्क मंदिराला जाणार आणि तिथूनच परत मुंबईला. ही पेटी तिला द्या.” शुभदाला थोडे आश्चर्यच वाटले ‘ज्योती तर येणार होतीच मग ही थांबत का नाही’, पण ती बोलली नाही ‘बरं’ म्हणून  तीने पेटी घेतली. संध्याकाळी धर्मशाळेत परत आल्यावर मात्र तिला एकीकडे कर्तव्यपुर्तीचे समाधान वाटले तरी दुसरीकडे मन कासावीस झालेच. प्रकाश आणि शुभेंदू बारावीला असल्यापासून पटनाईकांशी सहकारी म्हणून ओळख, मग मानलेला भाऊ-बहिणीचे नाते आणि शुभेंदू ज्योतीच्या विवाहाने झालेले प्रत्यक्ष नात्यात रूपांतर. सारे सारे चलत चित्रपटासारखे नजरेसमोर आले आणि आज प्रथमच काही त्यांचे पासून लपवून आपण भेटून आलो ही रुख रुख तिच्या मनाला लागली.

तिला आठवलं प्रकाशला ‘आय.आय.टी’ ला प्रवेश मिळाल्यावर जेव्हा उदय आणि ज्योतीला घेऊन ती नागपूरला गेली होती. माधवीची भेट आणि शरदच लग्ना पूर्वीचे प्रेमप्रकरण जरी सर्व कळून मनाला जखम झाली होती त्याच क्षणी ती सावधही झाली होती. एक पत्नी म्हणून, कारण माधवी आता शरदच्या ऑफिसमध्ये होती आणि त्यांच्या रोजच भेटी होणार. तिने कितीही विचार केला तरी यासाठी तिच्याकडे कुठला मार्ग नव्हता. ती जेव्हा सुट्टी नंतर मुलांना घेऊन ठाण्याला परत आली तेव्हाही या विचाराने तिची पाठ सोडली नव्हती… म्हणून तर तिने परत फडतरे ज्योतिषांची भेट घेतली होती. फडतरे यांनी तिला बरेच स्पष्ट शब्दात मार्गदर्शन केले होते. तिच्या जिद्दीचि ठिणगीचं जणू काही राखेतून फुलवली होती. तीचा आत्मविश्वास वाढवला होता. तिच्या सुदैवाने तिचा भाऊ मुंबईस बदलून आला होता. त्याचे करिता तिनेच ओळखीत जागा शोधली होती. थोड्याच दिवसात भाऊ भावजय आणि तिचे आई-वडीलही ठाण्यात आले. आता अगदी हक्काच्या प्रेमाचा आधार होता. तिच्या मनाने घेतले मी माझा संसार मोडू देणार नाही, माझी फरफट होणार नाही, आकाशातले ग्रह भले कितीही फिरू देत. तिने भावाला विश्वासात घेतले आणि सर्व किस्सा कानावर घातला. भाऊ संतापलाच पण त्याने सांगितले “हे बघ एक तर नोकरी सोड व नागपूरला जाऊन राहा. मुलांच्या शिक्षणाची काळजी सोड, आम्ही बघू त्यांना. नाहीतर तुझा नवरा परत बदलून कसा इथे येईल ते पहा.” तिने भावाच्या सल्ल्यावर विचार केला. एकदम इतकी चांगली नोकरी सोडणे तर शक्यच नव्हते. त्यात आता उदयचे दहावीचे वर्ष होते. प्रकाश इतकीच त्यालाही तिची गरज होती, पाठोपाठ ज्योती होतीच. तिने कधी नव्हे ते ऑफिस मध्ये  जास्तीत जास्त किती रजा मिळू शकते तो अंदाज घेतला. नोकरी न सोडता तिला नागपूर गाठायचं होते. तारेवरची कसरत होती, पण ती करणार होती एक महिना पगारी तर, एक महिना अर्ध पगारी रजा मान्य झाली आणि तिने मुलांना आई वडील व भावावर सोपवून नागपूर गाठले. ती अचानक पोहोचताच शरदला धक्का बसला पण बायको होती, आनंद झाला दाखविल्या वाचून गत्यंतर नव्हते. तिचा घरात प्रवेश होण्यापूर्वी माधवीची रवानगी करायला हवी होती. वेळ कमी होता, ती तर नागपूरला पोहोचली होती. घरात काही संशयास्पद दिसणार नाही याची काळजी घ्यायला सांगून त्याने माधवीला घराची डुप्लिकेट चावी देऊन पिटाळले. तिच्यासह तो घरी पोहोचला ते बरेच नाटक करून. ‘आपण बाहेर जेवण करूनच जाऊ’.. वगैरे बहाणे करत त्याने दोन अडीच तास काढले. ते घरी पोहोचले मात्र तिच्या तीक्ष्ण नजरेला शंका आलीच… पण  ती आता बोलणार नव्हती….

क्रमशः भाग ६-  चित भी मेरी पट भी मेरी….

 


No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...