नवरात्र - नव शक्तीचा उत्सव


देवी सरस्वती

ज्ञान आणि बुद्धीची देवी

आश्विन शुक्ल पक्षाची सप्तमी २८ सप्टेंबर दुपार नंतर सुरू होते आहे. देवी कालरात्रीचे पुजे नंतर ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा देखील सप्तमीला केली जाते. २९ सप्टेंबर, २०२५ ला सकाळी देवी सरस्वतीला पुजे साठी आव्हान (आमंत्रण) करायचे आहे. सप्तमी तिथी दुपारी ०४ वाजे पर्यंत आहे. तर ३० सप्टेंबर, २०२५ रोजी दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी या तिनही देवींची पुजा दुर्गाष्टमीला करायची आहे. तेंव्हा सरस्वती पूजा ही ३० सप्टेंबर रोजी  सकाळी  सरस्वती पूजा केली जाणार आहे.

 

देवी सरस्वतीची निर्मिती ब्रह्माने केली असे मानले जाते. देवी सरस्वती ब्रह्माच्या मुखातून प्रकट झाली आणि म्हणूनच ती वाणी, अभिव्यक्ती, विचार, ज्ञान आणि बुद्धीवर प्रभुत्व ठेवते. ती संगीताची देवी देखील आहे आणि म्हणूनच तिला वीणा धारण केलेली म्हणून चित्रित केले आहे. तिला 'गायत्री' किंवा 'शारदा', 'वेदमाता', 'भारती' आणि इतर अनेक नावांनी ओळखले जाते. सर्व प्रकारचे ज्ञान साधनेतून ज्ञानोदयाची प्राप्ती होते हेच देवी सरस्वतीचे तेजस्वी रूपातून प्रतीत होत असल्यानेच बहुदा तिला पांढऱ्या रंगाचे शुभ्र कपडे घातलेली, कमळावर बसलेली, वीणा, जपमाळ आणि वेद ,जे सर्व ज्ञानाचा स्रोत आहेत, ते धारण केलेली एक सुंदर देवी म्हणून चित्रित केले आहे. तिचे वाहन हंस आहे. देवी सरस्वतीची अवती भवती तिला आवडणारे मोरही दाखवले जातात.

 

देवी सरस्वतीची पूजा कशी करावी

पूजा सुरू करण्यापूर्वी, तुमचे मन आणि शरीर शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या मनात स्वच्छ, सकारात्मक विचार ठेवा, कोणत्याही जबरदस्तीने दुष्ट इच्छा बाळगू नका किंवा पूजा करू नका. तुमचे मन आणि शरीर चांगले विश्रांती घेऊन शांत असले पाहिजे.

जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करत असाल तर तुम्ही ती करू शकता किंवा तुमच्या भक्तीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश  त्यावर नारळ ठेवून पुजा  स्थानी ठेवू शकता

२९ सप्टेंबर रोजी सरस्वती आव्हान पूजा-  वेदीला फुलांनी सजवून आणि देवी सरस्वतीची प्रतिमा फुले, ज्ञानाची प्रतीके -पुस्तके, पेन किंवा इतर लेखन साहित्य आणि शक्य असल्यासतसेच वाद्य ठेवून केली जाते.

 तुम्ही पांढरे, गुलाबी किंवा पिवळे रंगाचे स्वच्छ, चमकदार वस्त्र घालू शकता.

३० सप्टेंबर रोजी- लवकर उठा व पूर्वीप्रमाणे सर्व पूजाविधी करा. पुस्तके, शैक्षणिक साहित्य ठेवण्यास विसरू नका याचा अर्थ तुमचा संगणक, लॅपटॉप असो अथवा मोबाईल सुध्दा. तुमच्या कौशल्यांचा सराव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांची पुजा  करू शकता. हा दिवस आयुध पूजनाचा असतो - येथे ‘आयुध’ म्हणजे फक्त युद्धात वापरल्या जाणाऱ्या शस्त्र असा अर्थ नाही तर अशी सर्व साधने जी तुम्हाला जगण्यास मदत करतात, तुमच्या उपजिवीकेची साधने ही त्यात येतात. उदाहरणार्थ पेन हे पत्रकाराचे साधन आहे आणि त्याचप्रमाणे आधुनिक युगातील तांत्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील आधुनिक मानवांची 'आयुधे' आहेत.

पांढरी, गुलाबी फुले किंवा पिवळी फुले अर्पण करा, जितके जास्त सुगंधित तितके चांगले कारण ज्ञान हे सुगंधा प्रमाणे असते. त्याचा दरवळ दूर पर्यंत पसरतो व आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देतो.

 प्रसाद किंवा नैवेद्यात - तुम्ही प्रसादात फळे किंवा खीर अर्पण करू शकता

 देवी सरस्वतीचा मंत्राचा जप करा-

 || ॐ ह्रिं श्रीं वाग्देव्यै सरस्वत्यै नमः || 

 Om Aim Hreem Shreem Vaagdevayi Saraswatyai Namah

या मंत्रांव्यतिरिक्त - "या कुंदेंदु तुषार हार धवला..." ही प्रार्थना म्हणू  येईल.

ज्ञानाच्या प्रकाशाची पूजा करण्यासाठी देवी सरस्वतीसमोर दिवा आणि धूप लावा.

देवी सरस्वती तुम्हाला ज्ञान आणि शिक्षणाचा आशीर्वाद देवो जेणेकरून तुम्ही अज्ञानावर मात करू शकाल आणि योग्य - अयोग्य, चांगले - वाईट, काय स्विकारायचे व काय नाकारायचे यात फरक करू शकाल.

                                              🙏🙏🙏

                                              ज्योतिषाचार्य डॉ. अनुपमा रहाळकर


No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...