आपण ‘लेखांक -१’ मधे
“पिशाच्चयोग” अथवा “शापित योग” याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. मला आपणाला
मुख्यत्वेकरून हे सांगायचे आहे, की सध्या वावटळीसारखे ‘पिशाच्च’योगाबद्दल भीतीदायक वातावरण तयार केले जाते
आहे. स्पष्टपणे हा जातकांना भय निर्माण करणारा प्रकार आहे म्हटले तर चूक होणार
नाही. मागच्या लेखातच मी बरेचसे समजावून दिले आहे. गोचरीने तात्पुरत्या काळासाठी
येणा-या या योगाचे भय बाळगू नका. इथे पितृदोष, पूर्वज,
पूर्वजन्म,
अशा अनेक कारणांनी याला ‘शापित’ अथवा ‘पिशाच्च योग’
म्हटले जात असले तरी आपण तसे पाहिले तर आपल्यापैकी कुणाकुणाच्या पत्रिकेत राहू आणि
शनी अथवा केतू आणि शनी एकत्र असतात.
त्यालाही‘पिशाच्च योग’ असेच म्हटले जाते पण
पूर्ण पत्रिका पाहूनच गांभीर्य ओळखावे.
ज्योतिष शास्त्रात कुठल्याही व्यक्तीचे
पत्रिकेत प्रथम भावात राहू ,पाचव्या भावात शनि आणि नवम् भावात मंगळ असेल तर या स्थितीलाही ‘पिशाच्च
योग’ म्हणतात. कुठल्याही व्यक्तीच्या पत्रिकेत द्वितीय भावात राहू किंवा केतू, किंवा चतुर्थ भावात
राहू किंवा केतू असतील तर तोही शापित योग मानला जातो. या सर्वाचा पूर्वजन्म, पूर्व जन्मातील कर्म
दोष या सर्वांशी संबंध आहे. एवढेच ध्यानी घ्यावे व चिंता करू नये. या ठिकाणी
ज्यांच्या पत्रिकेत राहु व शनी एकत्र आहेत अशा काही व्यक्तींची नावे मी देत आहे.
(१) अमेरिकन टेनिस पटू, मार्टिना नवरातिलोवा- शनी+राहु अष्टम स्थानी युती, (२) सनी देओल- फिल्म
अभिनेता व राजकारणी, ( पूर्व एम.पी.(गुरुदासपूर))- धनु लग्न असून व्ययस्थानात शनी+राहु युती, (३) अर्षद वारसी-
बॉलीवुड अभिनेता - कर्क लग्न, लग्नी शनी+राहु युती.
सांगायचे तात्पर्य अशुभ
योग असले तरी व्यक्ती स्वतःच्या क्षेत्रात यश मिळवू शकतात. छोटेसे रोपटे
लावल्यानंतर त्याला ऊन, पाऊस, वारा, सूर्य प्रकाश सर्वाचि गरज असतेच. नाहीतर, ते रोप कोमेजून जाते. तद्वत प्रत्येक व्यक्तीचे
व्यक्तिमत्त्व घडताना सुख,दु:ख, कधी अपेक्षा पूर्ती तर कधी घोर अपेक्षा भंग, मान-अपमान अशा घटनांनी पैलू पडतात व अष्टपैलू
व्यक्तिमत्वे घडतात. सूवर्ण जसे आगीतून शुद्ध होवून उजळते तसेच साडेसातीतून तुमची
कार्यक्षमता वाढते, सहनशीलता, सत्वगुणाची जोपासना केली जाते.
शनी मीन गोचर भ्रमण
असताना इतर काही चांगले योग ही जुळून आले आहेत. षष्ठग्रही योग - देवगुरु
बृहस्पतींच्या मीन राशीत शनी, राहू, सूर्य, चंद्र, शुक्र, बुध हे ग्रह असता शनी+राहू शापित योग व शनी+चंद्राच्या विष योगा शिवाय
बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग, बुध शुक्र लक्ष्मी नारायण योग हे तीन अतिशय उत्तम योग मीन राशीत होणार
आहेत. मीन चंद्र रास असणा-या जातकाला याचा फायदा होणार आहे.
मीन राशीतून शनीचे गोचर भ्रमण -
सध्या मीन राशीत होणार्या
शनी व राहू युतीचे इतर परिणाम- दैनंदिन जीवनात परिश्रम, कष्ट यात वाढ होणार ते
बाराही राशींसाठी आहे. सर्व कामे मंद गतीने पण शिस्तीत होतील. मेष, मीन, कुंभ, धनु, सिंह या पाच राशींना
इतर सात राशींपेक्षा अधिक कष्ट अधिक दु:ख आहे. या जोडीला कुंभ व मीन राशींना ज्ञान
व सत्संग याचा लाभ आहे. अध्यात्मिक व्यक्तींचे मार्गदर्शन, सहवास लाभु शकतो.
त्याचा पुढील जीवनात कायमचा प्रभाव राहील. मेष, धनु व सिंह या राशींच्या व्यक्तींनी उतावळेपणा करू
नये. विधीलिखित चुकत नाही. घडणारे घडतच असते. कर्मभोग सर्वांनाच भोगून संपावयाचे
आहेत. तुम्हाला उपाय व उपासना यामुळे संकटांची एक तर तीव्रता कमी करता येईल किंवा
तीव्र कठोर परिस्थिती हाताळण्याची स्वतःची कार्यक्षमता, सहनशीलता वाढविता येईल.
सावध पाऊले टाकल्यास, मित्र कोण व शत्रू कोण याची ओळख होईल. शनी बरोबर असताना राहू काही मर्यादेत
आहे ही जमेची बाजू आहे. एरवी राहू सर्वच राशींना चकवा देणारा होवू शकतो. शनी राहू
युती कायद्याच्या कक्षेत काय घडवू शकते,
तर शनि कधीही सत्याची साथ सोडत नाही आणि राहू मात्र
तुमच्या शत्रूलाही जाऊन मिळतो. हीच कोंडी फोडण्याची ताकद मिळवण्यासाठी
सन्मार्गावरच रहा, सत्य बोला, धीर धरा, कोणालाही अपशब्द वापरू नका,
गैर मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. यासाठी, याठिकाणी कोर्टकचेरी
साठी उपाय- हनुमान चालीसा दररोज तीन वेळा म्हणून एकूण चाळीस (४०) वेळा पूर्ण करा.
कोर्टदाव्यात यशासाठी श्री हनुमान वडवानल स्तोत्र १,३,५,७,९,११ वेळा दररोज म्हणावे
(यासाठी पूर्वी दिलेली पोस्ट पहावी)
साडेसाती परिणाम व उपासना -
अ) मीन राशीसाठी-
[साडेसातीचे द्वितीय 'अडिचके']– गोचर भ्रमण सुरू असताना, देवबृहस्पतींची ज्ञानी राशी मीन व नक्षत्रे‘पूर्वाभाद्रपदा’
आणि‘उत्तराभाद्रपदा’ तसेच बुध स्वामी असलेले नक्षत्र रेवती यातून गोचर विशेष
प्रभावी असेल. गोचरीने शनिदेव एकादश व द्वादश दोन्ही भावात स्वामी म्हणून असतील.
प्रत्यक्षात‘द्वादश’ म्हणजेच‘व्ययस्थान’ हे शनीचे स्थान आहे. मीन चंद्र राशीत, प्रथमस्थानी शनिदेव
असताना या ठिकाणाहून तिसरे, सातवे व दहावे स्थानी शनीची दृष्टी असेल. भावंडांबरोबर संबंध चांगले
राहतील. बिघडले असले तरी सुधारतील. जोडीदाराशी मात्र जमवून घ्यावे लागेल. वादविवाद
टाळावेत. वैवाहिक जीवनात थोड्याफार कटकटी संभवतात. जोडीदाराची प्रकृती सांभाळावी.
नोकरी व व्यवसाय क्षेत्रात यश भरपूर आहे. नोकरीत असल्यास मानसन्मान, पदोन्नती आहे. जुलै
२०२५ ते नोव्हेंबर २०२५ मानसिक चिंता व प्रकृती दोन्हीवर दुष्परिणाम संभवतो.
तेंव्हा आधीपासूनच काळजी घ्या.
उपाय व उपासना -
शनिवारी काळ्या वस्तूंचे, लोखंडाचे दान करा. शनि मंदिरात शनि मूर्तीवर तेलाचा अभिषेक, तसेच वृद्ध, दिव्यांगी, दुबळे, अति गरीब व्यक्तींना
भोजनदान द्या. कपडे द्या. अंथरूण पांघरूण द्या. {रग,
चादर इत्यादी}
तसेच कावळा व काळे कुत्रे यांना भाकरी अथवा पोळी खाऊ
घाला. शनिवारी उपवास करावा. शनि महात्म्य दररोज वाचावे किंवा ऐकावे. मारुती
स्तोत्र पठण करावे.

ब) कुंभ राशी-
[साडेसाती चे तिसरे व शेवटचे 'अडीचके']- शनी या राशीचा स्वामी असल्याने इतर राशींच्या मानाने कुंभ राशीच्या
जातकांना साडेसाती सुसह्य असते. त्यात आता तर शेवटचे अडीचके सुरू होत आहे. पण
हुरळून जावू नका. आपण कधी दुसर्याच्या मुलांना जास्त शिस्त लावायला जातो का? सेम तस्सेच कधी कधी
घडते बरं! थप्पड, छडीचा मार आपल्याच पोरांना शनिदेव जरा जास्तच देतात [ही मंगळाची पण ख्याती
आहे]. उद्देश एकच असतो, दुसरा कोणी आपल्या पोराला नांवे ठेवू नये. तर हे सर्व तुम्ही गेली पाच
वर्षे सहन केलेले आहे. आता अजून फक्त अडीच वर्षे! काळ थोडासा वाटला तरी अजून दोन
वर्षे खडतर आहेत, नंतरचे सहा महिने शनी कृपेचे असतील. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.
गेल्या पाच वर्षांत कुणाचे पितृछत्र किंवा मातृछत्र हरपले असेल, दुःखाची कळ अजूनही
असणार, त्यात
फुंकर घालत ज्यांचे विवाह लांबले आहेत वय जास्त होवून ही त्यांचे विवाह झाले नाहीत
त्यांना योग्य जोडीदार शनिदेव मिळवून देतील. कुठे कुठे वैवाहिक जीवनात अपत्य सुख
नाही एवढीच कमतरता आहे तिथे अपत्य प्राप्ती होईल. नोकरी, व्यवसाय क्षेत्रात यश
असे राहून गेलेली पारितोषिके देवूनच शनिदेव २०२७ मधे निरोप घेतील. तुम्ही मात्र
आता पासून उपाय, उपासना करावी.
उपाय व उपासना- नवग्रह
स्तोत्र पठण, काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करावे,
शनिवारी चढते उतरते दिवे लावा. दर शनिवारी काळी उडद
डाळ व मोहरीचे तेल गरीबांना दान करा.
(क) मेष राशी-[साडेसातीचे प्रथम चरण पहिले, 'अडिचके']-
मेष राशीस बारावा शनी येत आहे. अति क्रूर, क्रोधी, कठोर, त्यात मेष राशीचा
स्वामी मंगळ हा शनीचा शत्रु आहे म्हणजेच शनी खूप काही नुकसान करणारा आहे असे
समजायचे कारण नाही.
मेष राशीच्या जातकांना
साडेसातीचे हे पहिले अडिचके कठीण जाणार एवढे उघड आहे स्वतःची पत्रिका नजरे समोर
आणा. मेष रास जन्म-चंद्र कुंडली. व्ययात द्वादश स्थानात मीन राशीत शनिदेव व सध्या
काही काळ इतर पाच ग्रह.
षष्ठ स्थानात केतू.
बाकी गोचर ग्रह सध्या बघण्याची तेवढी गरज नाही. कारण सहा ग्रह व्ययात, चंद्र प्रथम व केतू
षष्ठात. व्ययस्थान म्हणजे खर्चाचे प्रमाण वाढेल, प्रवास भरपूर होणार आहेत, कायमच ट्रेन किंवा
विमानात वास्तव्य म्हणायला हरकत नाही. मित्रांसाठी सढळ हाताने खर्च करणार आहात मदत
स्वरूपात, पण
सावधान एखाद्या मित्राच्या कडूनच फसवणूक होवू शकते. मित्राला मदत करु नका असे नाही
पण डोळे उघडे ठेवून मदत करा. तुमच्या नाही तर तुमच्या कुटुंबियांवर आरोग्यासाठी
खर्च होणार, अध्यात्मिक बनाल. तीर्थक्षेत्र,
देऊळे भेटी दिल्या जातील तिथे दान धर्म कराल. हरकत
नाही. कुठलाही खर्च करा पण फसवणूक होणार नाही त्यातूनच कायद्याचे प्रश्न निर्माण
होणार नाहीत यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे. कुठल्याही प्रकारचे कारणाने
कोणी हितशत्रू दोषारोप करू शकतो अशी ग्रहस्थिती आहे व सावध करणे माझे कर्तव्य आहे.
एरवी नोकरीत लाभ, पदोन्नती, अधिकार पदावरील
नियुक्ती, आर्थिक
स्थिती उत्तम, विवाह योग्य वय असेल तर विवाह संभवतो. आरोग्याचे बाबतीत वाहन भरधाव वेगाने
चालवू नये. अन्नातून विषबाधा होऊ शकते शिळे अन्न खाऊ नये.
उपाय व उपासना -
शनिवारी बजरंग बाण पाठ करावा.
ड) धनु रास चवथा शनी
(शनी ढैय्या)- शनीची ढैय्या अडीच वर्षे म्हणजे ३० महिने आहे. तुमच्या जन्म राशीत
म्हणजे चंद्र राशीत चतुर्थ स्थानी मीन रास येते. या ठिकाणी शनिदेव गोचरीने येत
आहेत. हे मातृ स्थान आहे. शनीची ढैय्या वृद्ध व्यक्तींसाठी अवघड आहे. आईस, सासूला तसेच वडील व
सासरे यांच्या प्रकृती संभाळावे. शनी मीन राशीत येत आहे त्यात आधीचे इतर ग्रह आहेत
या सर्वांची सातवी दृष्टी कर्म स्थानावर म्हणजेच दशम स्थानी आहे. नवीन नोकरी, प्रमोशन, नोकरीत बदल होताना अधिक
उच्च पदावर नियुक्ती, मात्र अनेक अडथळे येतील. राहण्याचे ठिकाण बदलू शकते. नवीन घर विकत घेण्याची
संधी येईल पण कर्जाचा बोजा वाढेल. परदेशी नोकरी निमित्त जाण्याची शक्यता. प्रकृतीस
सांभाळून राहावे. संताप करू नये. अपशब्द वापरू नये. शांत डोक्याने विचार करीत काम
करणे आवश्यक. आरोग्याचे बाबतीत- पचनाचे विकार, बीपी वाढू शकते किंवा अति काळजी मुळे हृदयविकार
होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक. कारण चतुर्थात रवी व राहू पण आहेत.
उपाय व उपासना- नवग्रह
स्तोत्र नियमित म्हणावे, “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र दररोज २३ वेळा म्हणावा. शनिवारी उपवास करावा.
ई) सिंह रास आठवा शनी
(शनी ढैय्या) - धनु राशीप्रमाणे सिंह राशीस शनी ढैय्या अडीच वर्षे आहे. सिंह राशिस
आठवा शनी आहे येत आहे. कष्ट, श्रम आर्थिक नुकसान सर्व ठिकाणी दुय्यम वागणूक, असे ग्रहमान या
जंगलच्या राजाचे आहे. मवाळ धोरणच या शनी ढैय्येमधे नैय्या पार करण्यासाठी अवलंबावे
लागेल.कुठलाही प्रश्न प्रतिष्ठेचा न बनवता इतरांना बरोबर घेऊन चाललात तर यशात
सिंहाचा वाटा मिळूही शक्यतो. राजकारणी व्यक्ती, तुम्ही धोरण पाहून तोरण बांधण्यात वाकबगार. कोण
म्हणतं सिंह लबाडी करत नाही? त्याची लबाडी इतरांना घातक नसते इतकेच. स्वत:चा हिस्सा तो कधीही सोडणार
नाही. तो राजा आहे, राजासारखा वागतो.
उपाय व उपासना- नवग्रह
स्तोत्र नियमित म्हणावे, “ॐ शं शनैश्चराय नमः” हा मंत्र दररोज २३ वेळा म्हणावा. शनिवारी उपवास करावा.
रेखा छत्रे रहाळकर ज्योतिष विशारद, भविष्य भूषण,
हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ