नवरात्र - नव शक्तीचा उत्सव



देवी कुष्मांडा - ब्रह्मांडाची निर्माती


लाखो वर्षांपूर्वी जेव्हा विश्व अंधकारमय होते, तेव्हा देवी पार्वती दिव्य प्रकाशाच्या रूपात प्रकट झाली आणि तिच्या सुंदर स्मितहास्याचा एका छोट्याशा कवडश्यातून तिने विश्वाची निर्मिती केली. देवी पार्वतीने सूर्य, ग्रह, तारे आणि आकाशगंगा निर्माण केल्या. खरं तर, असे मानले जाते की देवी पार्वती ही हजारो सूर्यांची निर्मिती करणारी, विश्वातील सर्व उर्जेची स्रोत आहे. ती सूर्याच्या गाभ्यात राहते आणि त्याला उष्णता व विकिरण करणारी ऊर्जा देते जी विश्वाला प्रकाश प्रदान करते आणि पृथ्वीवरील जीवनाचे पोषण करते. अशा प्रकारे, या स्वरूपात देवी पार्वतीला देवी कुष्मांडा किंवा माँ  अथवा माता कुष्मांडा असे म्हणतात. संस्कृतमध्ये हा शब्द 'कु' म्हणजे लहान किंवा सुक्ष्म असा होतो, 'उष्मा' म्हणजे उबदार, 'अंड' म्हणजे अंडी. म्हणून सूर्य आणि संपूर्ण विश्वाची किंवा ब्रह्मांडाची निर्माती - 'देवी कुष्मांडा' असे म्हणतात.


देवी कुष्मांडा सिंहावर स्वार होते. तिला आठ हात आहेत म्हणून तिला 'अष्टभुजा' म्हणतात. तिच्या हातात शस्त्रे आहेत. तिच्या उजव्या हातात अमृताचे कमंडलू आहे व डाव्या हातात जपमाळा आहे. तिच्या जपमाळेमध्ये तिच्या भक्तांना सर्व सिद्धी आणि निधी देण्याची शक्ती आहे असे मानले जाते.


देवी कुष्मांडाला तीन डोळे आहेत. पुराणांमध्ये देवीने हे विश्व कसे निर्माण केले याची कथा सांगितली आहे. देवी कुष्मांडाने तिच्या डाव्या डोळ्यापासून अतिशय काळी आणि भयंकर देवी महाकाली निर्माण केली, सोनेरी तेज असलेली देवी महालक्ष्मी देवी कुष्मांडाच्या कपाळावरील डोळ्यापासून निर्माण झाली आणि तिच्या उजव्या डोळ्यापासून तिने गोरी आणि शांत देवी महासरस्वती निर्माण केली. म्हणून देवी कुष्मांडाला 'आदि शक्ती' असेही संबोधले जाते - आदि म्हणजे इतरांपूर्वीची एक.


देवी कुष्मांडा अनाहत चक्राला ऊर्जा देते. ती चैतन्य, ऊर्जा, उबदारपणा, प्रेम, दया, समृद्धीचे प्रतीक आहे. आनंद, आरोग्य आणि विपुलता शोधणाऱ्यांकडून तिची पूजा केली जाते.


देवी कुष्मांडाची पूजा आश्विन शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी, आश्विन चतुर्थीला केली जाते. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ०७.१९ वाजता तृतीया संपणार असल्याने त्यानंतर चतुर्थी सुरू होते.


देवी कुष्मांडा यांची पूजा कशी करावी


पूजा सुरू करण्यापूर्वी, तुमचे मन आणि शरीर शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या मनात स्वच्छ, सकारात्मक विचार ठेवा, कोणत्याही जबरदस्तीने दुष्ट इच्छा बाळगू नका किंवा पूजा करू नका. तुमचे मन आणि शरीर चांगले विश्रांती घेऊन शांत असले पाहिजे.


जर तुम्ही पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करत असाल तर तुम्ही ती करू शकता किंवा तुमच्या भक्तीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश  त्यावर नारळ ठेवून पुजा  स्थानी ठेवू शकता. 


देवी कुष्मांडा यांची मूर्ती किंवा चित्र वेदीवर चमकदार लाल रंगाच्या किंवा पिवळ्या कापडावर ठेवा.


लाल रंगाचे कपडे घाला आणि देवी कुष्मांडा यांच्या वेदीला लाल रंगात सजवा.


लाल रंगाची फुले अर्पण करा, तुम्हाला लाल रंगात  फुलांचे उत्तम वविविध प्रकार मिळू शकतात.


प्रसाद किंवा नैविद्य - मालपुआ हा तिचा आवडता पदार्थ आहे पण देवीला साखरेच्या पाकात भिजवलेल्या पुरी किंवा चिरोटे अर्पण करता येतात. पर्यायी, खीर किंवा पंचामृत (दही, मध, साखर, दूध आणि तूप) देखील चालेल.


दुर्गा सप्तशती मंत्र किंवा पर्यायी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करा आणि देवी कुष्मांडा या मंत्राचा जप करा.


।।ॐ कौष्मांडाय नमः:।।    (Om Kushmanday Namah) 


तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, तेल शक्यतो तिळाचे असावे. देवी कुष्मांडा यांच्या आदरार्थ आरती करा.


तुमच्या अनाहत चक्राचे ध्यान करा.


मातेची पूजा केल्याने भक्तांना शक्ती, सिद्धी, रिद्धी आणि आत्मीयतेचा लाभ मिळते.


जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही  आहारात फक्त उपवासासाठी असलेले अन्न, फळे आणि दूध घेऊ शकता.


देवी कुष्मांडा तुम्हाला शक्ती आणि समृद्धीने आशीर्वाद देवो. देवी तुमचे हृदय प्रेम आणि दयाळूपणाने भरो. तुमच्या प्रेमाची ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत तुमचा स्नेह पोहोचो.   🙏🙏🙏


ज्योतिषाचार्य डॉ. अनुपमा रहाळकर 


No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...