जेंव्हा भाषा नव्हती, शब्दच नव्हते तेव्हा मनुष्यप्राणी कसे संवाद साधायचा? कसा आपल्या भावना, आपले विचार दुस-यांना सांगायचा? अति प्राचीन काळात मानव इतर प्राण्यां प्रमाणेच आपल्या मनातील विचार दुस-या मानवा पर्यंत पोहोचवत असेल. जसे प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ, सिग्मंड फ्रॉईड यांनी व्यक्त केलेल्या मता प्रमाणे, कीटक व मुंग्या आपल्या सामूहिक इच्छाशक्तीने टेलिपथी द्वारे आपले कार्य करीत असावे. तसेच प्राचीन काळी कदाचित मानव सुद्धा आपल्या समूहात ही टेलिपथी एकमेकांचा विचार जाणून घेण्यासाठी वापरत असेल. चेह-याचे हावभाव, दृष्टिक्षेप हे तेंव्हा उपयोगात येत असतील जेंव्हा व्यक्ती एकमेकांच्या सानिध्यात असतील पण दूरवरच्या व्यक्तींशी विचारांचे दळणवळण टेलिपथीद्वारे होत असावे.
काळाप्रमाणे मनुष्याची उत्क्रांती होताना मेंदू प्रगत होताना, भाषेचा विकास होताना, मानवाने संप्रेक्षणाच्या नवनवीन पद्धती अवलंबल्या व टेलिपथीची प्रक्रिया, म्हणजे ‘मनाने मनाच्या तारा जोडण्याची’ प्रक्रिया मागे पडली. त्याची जागा टेलिफोनच्या तारांनी घेतली आणि आता तर वायरलेस कम्युनिकेशन- मोबाईलचा वापर होत आहे. पूर्वी पत्रे लिहिली जायची तेव्हा लिखाणाचा सराव सर्वांना होता. आता ई-मेल, एसएमएस, आणि व्हाट्सअपचा वापर करताना आपण हाताने लिहिणे विसरत चाललो आहोत. अशा परिस्थितीत किती दूर गेली टेलीपथी आपल्या जीवनातून! याचा अर्थ जी अतिंद्रिय शक्ती, अति प्राचीन मनुष्यात सरसकट प्रकर्षाने अस्तित्वात होती, ती आता काही निवडक व्यक्तीं मध्ये नैसर्गिक रित्या अस्तित्वात आहे व काही मोजक्या जणांनाच ती ध्यान धारणेच्या साधनेतून उर्जित करता येते. अर्थात आजच्या भाषेत बोलायचं तर ‘ऍक्टिव्ह’ करता येते पण याचा अर्थ असा नाही, की ही शक्ती सर्वसाधारण व्यक्तींमध्ये नसतेच फक्त तिची जाणीव नसते. दैनंदिन जीवनात कित्येक व्यक्तींना टेलिपथीचे अस्तित्व जाणवते पण ती ‘टेलिपथी’ आहे हे मात्र माहीत नसते. हा अनुभव म्हणजे ‘टेलिपथी’ हे ज्ञान नसते. उदाहरणच पहा ना कित्येक वेळा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो आणि काही वेळात ती व्यक्तीच आपल्या समोर येते. काही वेळेस बोलता-बोलता दोन व्यक्ती एकच विचार प्रकट करतात तेव्हा आपल्या आणि दुस-या व्यक्तीला असे लक्षात येते की आपण एकाच वेळी एकच विचार केला होता. ब-याचदा आपल्या मनात विचार येतो की “फोन वाजला” आणि आपण फोनकडे पाहतो तोवर फोनची रिंग वाजते. जेंव्हा एखादी व्यक्ती, आपल्या जवळची, नात्यातली आपल्या पासून दूर असते. आजारी किंवा संकटात असते तेंव्हा आपल्याला सारखी त्या व्यक्तीची आठवण येते मनाला हुरहूर लागते आणि न राहून आपण त्या व्यक्तीला फोन करतो किंवा काही दिवसांनी आपल्याला समजते कि ती व्यक्ती तिच्या आजारपणात किंवा संकटात आपलीच आठवण काढीत होती. असेच स्वप्नांच्या बाबतही होते. काही लोकांचे अनुभव आहेत की एका वेळी दोन व्यक्तींना सारखेच स्वप्न पडते किंवा स्वप्नातच कोणी वयस्कर व्यक्ती अथवा आपले गुरु आपल्या मनातील एखाद्या शंकेचे उत्तर देतात व निरसन करतात.
हे सर्व अनुभव
केवळ योगायोग नाहीत. अभ्यासकांच्या मते जेंव्हा आपले आंतरिक
मन जागृत होते,
मग
ते स्वप्नात असो,
एकांतात
असो किंवा
गर्दीत असो अभावितपणे
एखाद्या क्षणासाठी ते आपले लक्ष वेधून घेते. गर्दीत जेंव्हा दुरवर एखादी ओळखीची व्यक्ति दिसते, हाक मारूनही आपला आवाज त्या व्यक्ति पर्यंत
पोहोचणे शक्य नसते अशा वेळी आपल्या मनात येते की त्या व्यक्तीने वळून आपल्याकडे
पहावे आणि अगदी तसेच होते आपले मन दुस-या
व्यक्तिच्या अंतर्मनाशी
जोडले जाते. ती व्यक्ती आपल्याकडे पाहते. आजकालच्या भाषेत सांगायचे तर एक जागृत मन दुसऱ्या
जागरूक मनाची फ्रिक्वेन्सी त्यावेळेस पकडते, जसे रेडिओची फ्रिक्वेन्सी
असते अगदी त्याप्रमाणेच पण अशा घटना अनेकदा अचानक घडतात व त्यामुळे त्यांच्या नोंदी
ठेवणे किंवा पुन्हा पुन्हा जसेच्या तसे ते अनुभव सत्यात उतरवणे
हे शक्य होत नाही म्हणून शास्त्रीय पद्धतीने या अनुभवांचा अभ्यास करता येणे कठीण होते. अनेक
वर्षां पासुन भारतात तसे विदेशातही मानसशास्त्रज्ञ टेलिपथी संबंधी संशोधन करीत
आहेत. मुळात या संशोधनाची सुरूवात इथ पासून होती की टेलिपथी ही भौतीक प्रक्रियेतून
उत्पन्न होते की मानसिक प्रक्रिया आहे, की त्याही पलीकडे जाऊन परामानसशास्त्रीय
घटना आहे.
(क्रमशः)