‘टेलिपथी’ - एक अलौकीक अतिंद्रीय शक्ति

 


निसर्गाचे नियम सृष्टीला अनुसरून स्थूल व सूक्ष्म प्रकृतीचे असतात. शास्त्र कोणतेही असो, प्रथम स्थूल सृष्टीच्या नियमांचा उलगडा करीत सूक्ष्म सृष्टीचे नियमांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  तरच विज्ञानाचे परिपूर्ण आकलन होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर त्या शास्त्रा बद्दल संपूर्ण ज्ञान होऊ शकते. जसे उदाहरणार्थ अणुशक्तीच्या शोधा पासून आपण आता नॅनो पार्टिकल पर्यंत येऊन पोहोचलो आहोत पण शास्त्रज्ञांचा हा प्रवास सहज नव्हता २०० वर्षां पूर्वी ही कल्पना हास्यास्पद वाटली असती पण आज हे ज्ञान अवगत झाले आहे. या प्रमाणे अशा अनेक सूक्ष्म सृष्टीच्या संकल्पना मानवाला अवगत करून घ्यायच्या आहेत, शास्त्रज्ञांनी शोध लावणे आवश्यक आहे व या सूक्ष्म सृष्टीच्या निसर्ग नियमांना व्यवहार्य स्वरुपात आणण्यासाठी, त्याचा यथोचित अभ्यास होणे हे ही आवश्यक आहे, नाही तर नुकसान विज्ञानाचे व त्यामुळे मानवाचेच होणार आहे. भौतिक स्वरुपाचे अनेक शोध मानवाने आज पर्यंत लावले. त्यात खूप उंचीही  गाठली. मानसशास्त्रा मध्ये केलेले प्रयोग हे सुडोसायन्स (Pseudoscience) मध्ये गणले जातात. आजच्या समाजाने मानसशास्त्राला सुडोसायन्स (Pseudoscience) म्हणून मान्य केले आहे पण या सुडोसायन्सच्या पलीकडे असलेले परामानसशास्त्र (Parapsychology) ही आहे. या परामानसशास्त्रीय विषयांचा उलगडा सध्या प्रचलित अशा स्थूल शास्त्रीय भाषेत करणे जरा अवघडच आहे.  टेलिपथी हा असाच परामानसशास्त्राशी निगडित विषय आहे. कोणताही परामानसशास्त्रीय विषय समजून घेण्यासाठी बुद्धी व विचारा सहित बाह्य मनाबरोबरच आपले अंतर्मन व आत्मिक जाणीव जागृत असणे, सचेत असणे तसेच तरल व संवेदनक्षम असणे आवश्यक आहे. आपले विचार सकारात्मक व नवीन संकल्पनांचा स्वीकार करायला तयार असायला हवे. यासाठी आपली ग्रहण क्षमता व तर्क क्षमता तसेच मनाची एकाग्रता वाढवणे जरुरी आहे तरच आपण परामानसशास्त्रतील विषयांचे थोडेफार आकलन करू शकतो.

टेलिपथी ही एक अत्यंत महत्त्वाची अतिन्द्रीय शक्ती मानली जाते. ब्रिटनमधील सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च या विख्यात संस्थेचे संस्थापक डॉ. फ्रेडरिक मायर्स यांनी  १८८२ मध्ये प्रथम टेलिपथी हा शब्द वापरात आणला. याला मराठी मध्ये आपण विचार संक्रमण अथवा मानस संदेश किंवा दूर संवेदन अशा नावांनी ओळखतो. जसे टेलिव्हिजन अथवा टेलिफोन या शब्दां मध्ये टेली हा शब्द अंतर दर्शवणारा आहे  तसा  टेलिपथी  मध्ये.  येथे पथीचा अर्थ विचार आहे म्हणून दूर संवेदन इत्यादी शब्दात आपण टेलिपथीचा अर्थ सांगू शकतो. डॉ. फेडरिक मायर्स यांनी केलेली टेलिपथीची व्याख्या बघायची झाली तर ती अशी, ते म्हणतात, आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांच्या मदती शिवाय एका व्यक्तीच्या मनाने दूर अंतरावर असलेल्या दुसर्‍या व्यक्तीच्या मनाशी मनोमन संपर्क साधून केवळ संवेदनांद्वारे केलेल्या विचारांचे दळणवळण म्हणजे टेलिपथी होय.”

टेलिपथी मध्ये दुसर्‍याचे विचार त्याने न सांगता किंवा इतर कोणतेही ज्ञात साधनाविना दुसरी व्यक्ती कितीही दूर असली तरी ते समजून घेता येतात व सांगता येतात अर्थात टेलिपथी मध्ये एका मनाकडून दुसर्‍या मनाशी विचार संप्रेषण अंतर्भूत असते. एक व्यक्ती आपली विचार संवेदने स्पंदन स्वरुपाने दुसर्‍या व्यक्तीकडे प्रक्षेपित करते व दुसरी व्यक्ती या स्पंदनांचे ग्रहण करते या पद्धतीने संदेश शब्दश:, जसेच्या तसे असतीलच असे नाही पण सारांश स्वरूपात त्यांचा अर्थ समजून घ्यायचा असतो. जसे कोणत्याही माध्यमाविना, शब्द अथवा साधनांच्या शिवाय एका व्यक्तीच्या मनातले विचार दुसर्‍या व्यक्तीच्या मनात येतात किंवा उमगतात त्याप्रमाणे काही वेळेस एका व्यक्तीच्या शारीरिक वेदना सुद्धा दुसर्‍या व्यक्तीला अनुभवास येणे अथवा एका व्यक्तीला येणारे अनुभव, प्रसंग तसेच दुसऱ्या व्यक्तीला स्वतः अनुभवल्या सारखे वाटणे या सर्व गोष्टी टेलिपथी या अर्थाने समजल्या जातात. अर्थात टेलिपथी मधील अनुभवांना अंतरांची मर्यादा नसते पण मानसिक संवेदना सक्षम असणे आवश्यक आहे.

साहजिकच तुमच्या मनात विचार आला असेल की या प्रकारे टेलिपथीचा उपयोग करता आला तर आपले काम किती सोपे होईल. मोबाईल रिचार्ज करण्याचे झंझटच राहणार नाही. पण त्याच वेळी तुम्हाला हेही लक्षात आले असेल की टेलिपथी या अतिंद्रीय शक्तीचा अभ्यास व उपयोग करणे तितके सोपे नाही. समाजातील काही निवडकच व्यक्तींमध्ये नैसर्गिकपणे टेलिपथी अस्तित्वात असल्याचे दिसून येते म्हणजे ती त्यांच्यात उपजतच असल्याचे आढळून आले आहे. अशा व्यक्ती टेलिपथीच्या आधारे दुसर्‍या व्यक्तीचे मनापर्यंत आपले संदेश सहज संप्रेषित करू शकतात. असे संदेश जागृत अवस्थेत अंतर्स्फूर्तीने किंवा झोपेतही स्वप्नांद्वारे अथवा अचानक विचार लहरींच्या माध्यमातून दिले जातात, काही व्यक्ती अनेक वर्षे ध्यान साधना करून आपल्या अंतर्मनातील सुप्त अवस्थेतील टेलिपथीची शक्ती विकसित करतात. यासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार, सतत सराव अशा सर्व गोष्टींचा अवलंब मनापासून व निष्ठेने करणे आवश्यक आहे पण तरीही अशी साधना करून त्यात यश मिळवणा-या व्यक्ती अगदी कमी प्रमाणात आढळतात. काही कारणाने टेलिपथीचा सराव जर मध्येच तुटला तर ही शक्ती लोप पावण्याची शक्यता असते. मुद्दामहून केलेल्या टेलिपथीच्या प्रयत्नापेक्षा सुद्धा जर सहज रित्या मनातील विचार दुसर्‍या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचवता आले तर ती टेलिपथी जास्त यशस्वी होते. हेच टेलिपथीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे व कदाचित याच कारणामुळे टेलिपथी या अलौकिक अतेंद्रिय शक्तीचे अस्तित्व पटवून देण्यासाठी प्रयत्न पूर्वक, मुद्दाम केलेले प्रयोग सफल होत नाहीत असे आढळून आले आहे. जितक्या सहजतेने टेलिपथीचा सराव आपले अंतर्मन जागृत करून सहजरीत्या, सकारात्मक दृष्टीने मन एकाग्र करून केले जातील तितक्या चांगल्या रितीने या शक्तीचा अनुभव आपल्याला घेता येईल.  अर्थात हे एक किंवा दोन दिवसाचे काम नाही तर अनेक दिवसांचे, वर्षांचे सरावातून शक्य आहे.

रोजच्या जीवनात आपण पाहतो की टि.व्ही वरील जाहिराती व मालिका आपल्या माध्यमातून तसेच चॅनल वर जोर जोरात ओरडून बातमीदार हे आपला संदेश लोकांच्या मनावर ठासून बिंबविण्याचा प्रयत्न करतात, तसेच निवडणूक काळात नेते मंडळी प्रचारा दरम्यान हातवारे करीत, मोठमोठ्याने बोलून, शब्दांनी भारावून टाकतात. पण हे सर्व बाह्य मनावर झालेले परिणाम असतात, काही संवेदनशील मने या गोष्टींनी प्रभावित होतातही, अगदी मतदानाची वेळ येई पर्यंत हा प्रभाव राहू शकतो. तरी ऐनवेळी अंतर्मनाचे ऐकून ते आपले मत त्याप्रमाणे देऊ शकतात म्हणुन असे म्हणता येते की टेलिपथीचा वरवरचा प्रयोग उपयोगी होत नाही कारण ही शक्ति अंतर्मनापर्यंत पोहोचली तरच प्रभावी ठरते  नाही तर हीचा उथळपणे केलेला उपयोग निरर्थक ठरतो.


लेखिका – रेखा छत्रे रहाळकर,

ज्योतिष विशारदभविष्य भूषण, हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


No comments:

Post a Comment

सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...